दिवाळीत एक गाणं नेहमी मनात येतंच. खासकरुन भाऊबिजेला. 'सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे, वेडी माया'. भावाला प्रेमानं ओवाळणाऱ्या बहिणीची माया खरोखर वेडीच असते. भाऊबिजेवरुन कितीही चिडवाचिडवी झाली तरी भावाचं प्रेम, त्यानं केलेले लाडच जास्त अप्रूपाचे असतात. पण या लहानशा बहिणीला त्या वेड्या मायेचा अर्थ कसा कळावा.. वेडी शब्द ऐकून ती बिंधास्त बहीण खोडकरपणे विचारतेय, मला वेडी बोललीस?
सोशल मीडियात व्हायरल व्हिडिओची ही गोष्ट. या व्हिडिओत एक चिमुकली बहीण भाऊबीजेनिमित्त आपल्या लहान भावाला ओवाळत आहे. तर मागून कुणीतरी महिला आई किंवा मावशी, किंवा आजी गाणं म्हणते आहे. सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया रे, वेड्या बहिणीची रे वेडी माया..
ते गाणं ऐकून ही धिटूकली पोर ओवाळता ओवाळता मिश्किलपणे विचारते, मला वेडी बोललीस? तिच्या या प्रश्नावर घरात एकच हशा पिकणं साहजिकच होतं. हा व्हिडिओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल आहे. ही बिंधास्त, टू द पॉइण्ट बोलणारी, निरागस मुलगी साऱ्यांनाच आवडते आहे. खोडकर प्रेमळ आणि निरागसपणाचं हे रुप.. आणि त्याचं अप्रूप म्हणून तर हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.