अजूनही बरसात आहे या मालिकेतील आदी-मीरा म्हणजे सध्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहेत. या जोडीवर मनापासून प्रेम करणाऱ्या आदीराज आणि मीराचे लग्न झाल्यावर प्रेक्षकांचा जीव खऱ्या अर्थाने भांड्यात पडला आहे. आदीराज पाठकची भूमिका साकारणारा उमेश कामत आणि मीरा देसाईची भूमिका करणारी मुक्ता बर्वे हे दोघेही तगडे कलाकार असल्याने प्रेक्षक या जोडीला खूप पसंती देताना दिसत आहेत. मीराचा या सिरीयलमधली लूक पहिल्यापासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. फ्लोरल प्रिंट असलेल्या ओढण्या, प्लेन कुर्ते, पँट आणि गळ्यातील वेगवेगळे स्कार्फ छोट्या पडद्यावरील चर्चेचा विषय ठरले आहेत. लग्नानंतरही मीरा आदीराज पाठक झालेल्या मीराच्या एकाहून एक सुंदर प्लेन साड्यांची आणि तिच्या ब्लाऊजचीही विशेष चर्चा आहे. इतकेच काय पण नेहमी सिंपल लूकमध्ये दिसणाऱ्या डॉ. मीराच्या गळ्यातील मंगळसूत्रही सध्या महिलावर्गाच्या चर्चेचा विषय आहे. कोणतीही मालिका आली की त्या मालिकेतील नायिका, सहनायिका, खलनायिका यांच्या कपड्यांच्या आणि दागिन्यांच्या फॅशन फॉलो केल्या जातात. तसेच मीराच्या गळ्यातील मंगळसूत्र सध्या चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आहे.
अतिशय साधे असणारे या लहान मंगळसूत्रामध्ये एका बाजूला काळे मणी आणि एका बाजूला प्लेन चेन देण्यात आली आहे. तर मधे एक मध्यम आकाराचा पांढरा मणी देण्यात आला आहे. मीराचे नुकतेच लग्न झाल्यामुळे ती लहान आणि मोठे अशी दोन्ही मंगळसूत्रे नियमित घालताना दिसते. पण हे लहान मंगळसूत्र पंजाबी ड्रेस, जीन्स अशा कशावरही अगदी छान दिसेल असे आहे. याआधी सोनाली कुलकर्णी हिच्या गळ्यात याच प्रकारचे मंगळसूत्र दिसून आले होते. कुणाल बेनोडेकरशी लग्न केल्यानंतर सोनाली आणि तिचा नवरा त्याच्या वाढदिवसानिमित्त मालदिवला गेले होते. त्यावेळी तिच्या गळ्यातील या आगळ्यावेगळ्या मंगळसूत्राने महिलांचे लक्ष वेधून घेतले होते.
याआधीही ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीचे मंगळसूत्र, ‘तू सौभाग्यवती हो’ मधील लक्ष्मी मंगळसूत्र, ‘कारभारी लयभारी’ मधील पियुचे हटके मंगळसूत्र आणि ‘अग्गबाई सासूबाई’मधील शुभ्राचे मंगळसूत्र यांसारख्या बऱ्याच मालिकांमधील प्रमुख पात्रांनी घातलेली मंगळसूत्रे रसिकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकांनंतर बाजारात या प्रकारच्या मंगळसूत्रांना मोठी मागणी सुरू झाल्याचेही चित्र होते. त्याचप्रमाणे आता मीराचे मंगळसूत्रही रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. अतिशय नाजूक आणि सोबर डिझाईन असलेले हे मंगळसूत्र गोल्डनमध्ये असले तरी त्यात सिल्व्हरमध्येही उपलब्ध आहेत. सध्या सिल्व्हर ज्वेलरीचा ट्रेंड असल्याने महिलांना रोजच्या वापरासाठी सतत नवीन काही ना काही हवे असते. महिलावर्गाने आता मीराच्या मंगळसूत्राची वेगवेगळ्या ऑनलाइन साईटसवर शोधाशोध सुरू केली असून बाजारातही तसे ट्रेंडी मंगळसूत्र कुठे मिळते का हे महिला शोधत आहेत.