Join us  

टूथपेस्टचे ५ जबरदस्त उपयोग, दात तर घासाच स्वच्छ-पण टूथपेस्ट वापरून करा भन्नाट चकाचक गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 5:31 PM

5 Uses of Toothpaste: टूथपेस्ट वापरून घरातल्या अनेक गोष्टी स्वच्छ करता येतात... करून बघा टूथपेस्टचा असाही उपयोग

ठळक मुद्देदररोज दात स्वच्छ करण्यासाठी तर आपण टुथपेस्ट वापरतोच. पण त्या व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींसाठी टुथपेस्ट वापरता येते. म्हणूनच तर करून बघा कधी कधी टुथपेस्टचा असाही उपयोग.

आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. लिंबू, बेकींगसोडा अशा गोष्टी जशा आपण खाण्यासाठी वापरतो तशाच त्या वेगवेगळ्या गोष्टींची स्वच्छता करण्यासाठी अगदी परफेक्ट ठरतात. किंवा आपल्या स्वयंपाक घरातले कित्येक पदार्थ केसांचे आणि त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी वापरले जातात. अशाच यादीतलं आणखी एक नाव म्हणजे टूथपेस्ट (use of toothpaste for cleaning various stains). दररोज दात स्वच्छ करण्यासाठी तर आपण टुथपेस्ट वापरतोच. पण त्या व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टींसाठी टुथपेस्ट वापरता येते. म्हणूनच तर करून बघा कधी कधी टुथपेस्टचा असाही उपयोग.(various uses of toothpaste in Marathi)

 

१. कपड्यांवरील चहा- कॉफीचे डाग काढण्यासाठी कपड्यांवर पडलेले चहा- कॉफीचे डाग लगेच धुवून टाकले तर बरं. नाहीतर मग ते डाग निघता निघत नाहीत. अशा पक्क्या डागांसाठी टूथपेस्ट वापरून पहा. यासाठी जिथे डाग पडला आहे, तो भाग ओला करून घ्या. त्यानंतर एखाद्या जुन्या ब्रशवर टुथपेस्ट घ्या. डागावर टुथपेस्ट घासा. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर पुन्हा तो कपड्याचा भाग थोडा ओला करा आणि कपडे धुण्याच्या ब्रशने चोळून डाग काढा. डाग लगेचच स्वच्छ होईल. 

 

२. आरसा पुसण्यासाठीघरातले सगळे आरसे स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट अतिशय कामाला येते. यासाठी आरसा आधी थोडा ओला करून घ्या. एका वर्तमान पत्राच्या कागदाची घडी घाला. त्या घडीवर अगदी थोडेसे पेस्ट लावा आणि मग आरशाला चोळा. आरसा लगेचच स्वच्छ, चकाचक दिसू लागेल.

 

३. कापडी बुट स्वच्छ करण्यासाठीआजकाल जवळपास सगळ्याच मुलांना शाळेमध्ये पांढरे बूट असतात. या कापडी बुटांवर ठिकठिकाणी डाग पडतात. शिवाय फिकट रंगाच्या स्पोर्ट शुजवर पडलेले डागही लगेचच दिसून येतात. हे डाग स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा चांगला वापर करता येतो. यासाठी जिथे डाग पडले आहेत तो भाग थोडा ओलसर करा आणि त्यावर जुन्या ब्रशच्या मदतीने पेस्ट चोळा. डाग लगेचच स्वच्छ होईल. यानंतर तो भाग ओल्या कपड्याने पुसून घ्या.

 

४. चांदीचे भांडे स्वच्छ करण्यासाठीचांदीच्या भांड्यांप्रमाणेच हिऱ्यांचे दागिने स्वच्छ करण्यासाठीही पेस्टचा वापर करता येतो. चांदीची भांडी घासताना ब्रशवर पेस्ट लावून घासू शकता. पण हिऱ्याचे दागिने स्वच्छ करायचे असतील तर तो दागिना ओला करा. हातावरच थोडीशी पेस्ट घ्या आणि ती बोटांनीच दागिन्यांवर चोळा. दागिन्यांचा मळकटपणा निघून जाईल आणि ते चकाचक दिसू लागतील. 

 

५. पिंपल्स घालविण्यासाठीचेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठीही टूथपेस्टचा वापर करता येतो. फक्त हा वापर करण्याआधी पॅचटेस्ट घ्या. एकदम सगळ्या चेहऱ्यावर हा प्रयोग करू नका. पेस्टचा असा वापर करायचा असेल तर बोटाच्या टोकावर थोडीशी पेस्ट घ्या आणि ती फक्त तुमच्या फोडावर लावा. यामुळे त्वचेची थोडी जळजळ होईल. पण खूप जास्त त्रास झाला तर लगेच धुवून टाका. त्रास नाही झाला तर १५ मिनिटे राहू द्या आणि त्यानंतर धुवून टाका. फोड लवकर दबून जातील. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडी