बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) आणि तिचे कुटुंबिय सध्या बरेच चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन ( Rajeev Sen)आणि त्याची पत्नी चारु असोपा (Charu Asopa) यांचा घटस्फोट. २०१९ मध्ये राजीव याने अभिनेत्री चारु हिच्याशी लग्न केले. मात्र गेल्या ३ वर्षात त्यांच्यात सातत्याने वाद होत असल्याने अखेर त्यांनी घटस्फोट घेण्याचे नक्की केल्याचे सांगण्यात येत आहे. जोडप्यामध्ये होणारे वाद त्या दोघांनी आणि दोघांच्या घरच्यांनीही अनेकदा मिटवण्याचे प्रयत्न केले. पण तरी त्यातून योग्य तो मार्ग निघत नसल्याने अखेर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांना ७ महिन्यांची मुलगी असून तिचे नाव झियाना आहे.
कोण आहे चारु असोपा
चारु ही हिंदी टेलिव्हिजनवर काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘मेरे आंगन मे’ या मालिकांमध्ये काम केल्याने तिची टेलिव्हिजनवर ओळख झाली. २००९ पासून चारुने अनेक हिंदी मालिकांमध्ये महत्त्वाचे रोल केले आहेत. त्यामुळे हिंदी टेलिव्हिजन सृष्टीत तिची चांगली ओळख आहे. चारु मूळची राजस्थानची असून कामानिमित्त बऱ्याच वर्षांपासून ती मुंबईमध्ये राहत आहे.
राजीव सेनशी लग्न
२०१९ मध्ये आधी रजिस्टर मॅरेज केल्यानंतर या दोघांनी गोव्यामध्ये बंगाली आणि राजस्थानी पद्धतीने लग्न केले होते. या लग्नाला दोघांच्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील अतिशय जवळच्या व्यक्ती उपस्थित होत्या. याआधीही या दोघांमध्ये वाद झाल्याने २०२० मध्ये ते दोघे वेगळे होणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यानंतर त्यांचे नाते काहीसे स्थिर झाले असावे. पण आता पुन्हा एकदा हे दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत.
वेगळे होण्याचे कारण काय असावे?
जोडप्यामध्ये अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींवरुन मतभेद असतात. या दोघांमध्येही सुरुवातीपासून अनेक मदभेद आहेत. मात्र या मतभेदांचे प्रमाण गेल्या काही वर्षात जास्त वाढल्याने अखेर ते घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचले असावेत. चारुने इन्स्टाग्रामवर राजीवसोबत असलेल्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. इतकेच नाही तर नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये अंतर नात्याला संपवत नाही, तर कमी संवाद आणि उशीरा दिलेल्या प्रतिक्रिया यांमुळे नात्यातले अंतर वाढते असे म्हटले आहे. चारुची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून फॅन्समध्ये त्याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. घटस्फोटाचे नेमके कारण समजू शकले नसले तरी त्यांच्यातील मतभेद हेच कारण असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.