दिवाळी जवळ आली की आपण फराळाचे पदार्थ करायचे नियोजन करतो. अगदी सगळे पदार्थ नाही तरी २ किंवा ४ पदार्थ तरी घरी केलेच जातात. फराळातील बहुतांश पदार्थ हे तळणीचेच असतात. यात शंकरपाळी, करंजी, शेव, चकली यांचा समावेश असतो. हे पदार्थ तळण्यासाठी बऱ्यापैकी तेल कढईत घेतले जाते. तरच ते नीट तळले जातात. मात्र पदार्थ तळून झाल्यावरही कढईमध्ये बरेच तेल उरते. गोडाचा पदार्थ तळला असेल तर तिखटाचा पदार्थ तळण्यासाठी आपण हे तेल वापरत नाही (Diwali 4 simple ways to reuse cooking oil of Diwali faral).
इतकेच नाही तर एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरणे आरोग्यासाठी घातक असते म्हणून आपण हे तेल काढून बाजूला ठेवून देतो. नंतर बराच काळ हे तेल तसेच पडून राहते. पण या तेलाचे करायचे काय असा प्रश्न आपल्या डोक्यात सुरूच असतो. हे तळणीचे तेल वाया जाऊ नये आणि त्याचा योग्य तो वापर व्हावा यासाठी काही सोपे पर्याय आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे आपले कामही होईल आणि तेलही उपयोगी येईल. पाहूयात हे पर्याय कोणते आणि ते कसे करायचे...
१. लेदरला चमकवण्यासाठी
आपण लेदरचे शूज, बेल्ट, सॅक, पर्स असं काही ना काही वापरतोच. काहीवेळा आपल्या फर्निचरलाही आपण लेदरचे कव्हर वापरलेले असते. वस्तू वापरुन काही दिवसांनी या लेदरची चमक जाते. त्यावर एकप्रकारचा पांढरा भुरा आल्यासारखे होते. अशावेळी या लेदरच्या गोष्टींना हे तळलेले तेल थोडे लावले तर त्यामुळे लेदरची जुनी चमक पुन्हा येण्यास मदत होते. यासाठी कोरड्या कपड्यावर थोडे तेल घेऊन लेदरच्या वस्तू पुसून काढा.
२. फर्निचरची चमक वाढवण्यासाठी
काहीवेळा आपल्या घरात बांबूचा झोका, खुर्च्या, टेबल असं काही ना काही असतं. या वस्तूंना ठराविक काळाने पॉलिश करण्याची आवश्यकता असते. पण आपल्याकडून ते नियमितपणे केलं जातंच असं नाही. अशावेळी या तळलेल्या तेलाने या फर्निचरला एक कोटींग केले तरी ते काही काळासाठी नव्यासारखे चमकते.
३. गंज काढण्यासाठी
स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या तेलाचा वापर आपण वस्तूंवरील गंज काढण्यासाठीही करू शकता. काहीवेळा आपल्या घरातल्या कड्या गंजल्याने घट्ट होतात. कुलूपात किल्ली जात नाही. अशा गंज चढलेल्या वस्तूंवर उरलेले तेल लावून ठेवून द्या. तेलातील ओलावा आणि ऑक्सिडेशनमुळे धातूचा गंज कमी होण्यास मदत होते.
४. पणत्यांमध्ये वापरण्यासाठी
दिवाळीत आपण दारात, तुळशीपाशी, गॅलरीमध्ये अगदी हॉलमध्ये सजावटीसाठीही बऱ्याच पणत्या लावतो. या सगळ्या पणत्यांमध्ये रोज हे तळणीचं थोडं थोडं तेल घातलं तरी हे तेल संपून जाते. गोडं तेल असल्याने त्याचा कोणताही अपायही होत नाही.