Join us  

दिवाळी : साफसफाई करा पण तब्येत सांभाळून, नाहीतर ऐन दिवाळीत तुम्ही दवाखान्यात ! बघा कशाने होते इन्फेक्शन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 12:02 PM

Diwali home cleaning tips how to take care of your health : स्वच्छतेच्या नादात दिवाळी बाजूला राहीली असं नको, म्हणून लक्षात ठेवा ४ गोष्टी..

सण म्हणजे घरात, मनात आनंद-उत्साह भरण्याचा काळ असतो. दिवाळी म्हटली की फराळ, घरातील वस्तू, नवीन कपडे यांची खरेदी याबरोबरच घराची साफसफाई करणे हे एक महत्त्वाचे काम असते. घरातल्या जुन्या वस्तू काढून टाकणे, जळमटं, कोपरे साफ करणे हे सगळे ओघानेच आले. यात एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे साफसफाई करण्याच्या नादात आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची विसरतो (Diwali home cleaning tips how to take care of your health). 

विकेंडला सगळं काम घाईत उरकण्याच्या नादात कधी आपण धडपडतो तर कधी धूळ नाकातोंडात गेल्याने आपल्याला सर्दी-खोकला होतो. मग ऐन दिवाळीत सगळे सणाचा आनंद घेत असताना आपण मात्र आजारी. आपल्या आजारपणामुळे घरातील सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडते. असं होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी आवर्जून घ्यायला हवी. त्यामुळे जर अजून तुमची घराची साफसफाई व्हायची असेल तर आधी हे वाचा आणि घरा बरोबर स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते ही जाणून घ्या. 

(Image : Google)

१. मास्क वापरणे- अनेकांना धुळीची अॅलर्जी असते, पण कामाच्या नादात आपल्या ते लक्षात येत नाही. अशा लोकांना धुळीमुळे सर्दी होणे / वाढणे, सतत शिंका येणे, घसा खराब होणे अशा समस्या भेडसावू शकतात. याशिवाय काही जणांना श्वसनाचाही त्रास होण्याची शक्यता असते. हा त्रास जास्त प्रमाणात झाला तर दम लागणे, धाप लागणे इत्यादी त्रास होऊ शकतात. तुम्हीही यातलेच एक असाल तर शक्यतो स्वतः साफसफाई करू नये. मदतनीसांकडून साफसफाई करुन घेत असाल तरी तिथे सतत उभे राहू नये. काहीच पर्याय नसेल तर तोंडाला मास्क लावून साफसफाई करणे केव्हाही जास्त चांगले. 

२. मोकळ्या हवेत जाणे - स्वच्छता करताना बहुतेकदा एक सलग काम केले जाते. त्यामुळे सतत उडणारी धूळ, मातीचे लहान कण हे श्वासनलीकेत जातात. सलग काम केल्याने दम लागण्याचीही शक्यता असते. असे होऊ नये यासाठी दर ५-१० मिनिटांनी थोडा ब्रेक घेत मोकळ्या हवेत जाऊन श्वास घ्यावा. यामुळे स्वच्छ हवा व ऑक्सिजन मिळाल्याने पुन्हा नवी एनर्जी जाणवते. 

३. हातमोजे व पायात चप्पल - स्वच्छता करताना बर्‍याचदा हा लहानशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. पण ही लहानशी काळजी फार आवश्यक असते. हातमोजे घालून काम करणे जमत नाही असे काही लोकांचे म्हणणे असते. पण नेमके इथेच आपल्याला इजा होण्याची शक्यता असते. साफसफाई करताना एखादी धारदार, टोकदार, बारीकशी वस्तू लागून इजा होण्याची शक्यता असते. कामाच्या गडबडीत आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचे मोठे परिणाम नंतर भोगावे लागू शकतात. त्यामुळे हातमोजे आणि पायमोजे किंवा चप्पल घालून मगच सफाईचे काम करावे.  

(Image : Google)

४. पाणी पिणे - बर्‍याचदा एरवीसुद्धा आपण मुबलक प्रमाणात पाणी प्यायला विसरतो. पण जेव्हा शारीरिक मेहनतीचे काम करतो त्यावेळी पाण्याची जास्त गरज असते. दमल्यावर आपल्याला घाम येतो आणि अशावेळी शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाणी, सरबत असे काही ना काही घेत राहणे केव्हाही जास्त चांगले. पाणी प्यायले गेले नाही तर युरीन इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सदिवाळी 2024दिवाळीतील पूजा विधी