Join us  

भातामुळे वजन वाढते? सानिया मिर्झा काय म्हणते पाहा.. व्हिडियो व्हायरल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 1:55 PM

भात हा अनेकांना आवडणारा पदार्थ पण वजनवाढीमुळे तो बदनाम झालेला दिसतो. भात खायला हरकत नाही पण तो खाताना काही नियम पाळणे गरजेचे आहे...

ठळक मुद्देभाताबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज असलेले पाहायला मिळतातपण काही नियम पाळून भात खाल्ला तर तो आरोग्यासाठी तोट्याचा नसतो

भाताबद्दल आपल्याकडे बरेच गैरसमज असतात. भात खाल्ल्याने वजन वाढते. भात दिवसातील याच वेळेला खायला हवा असे एक ना अनेक समज आपल्या मनात असतात. पण खरंच भात खाल्ल्याने वजन वाढते का? तर आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर त्यामुळे तुमचे वजन वाढत नाही. तसेच पारंपरिक पद्धतीने तुम्ही जे पदार्थ खात आला आहात तेच तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. पण भाताला कायमच बदनाम केले गेले आहे. भात खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटते असेही आपण अनेकदा म्हणतो. पण पुन्हा जेवताना भातावर गदा येतेच. प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा हिने असाच एक व्हिडियो नुकताच पोस्ट केला आहे. 

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या रील व्हिडियोमध्ये सानिया भात आणि सोबत कोणती भाजी किंवा करी खाताना दिसत आहे. हे खाताना तिचा चेहरा आनंदी असल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती वजन काट्यावर उभी राहून जोरात ओरडताना दिसत आहे. म्हणजेच भात खाल्ल्याने तिचे वजन वाढल्याचे तिला सांगायचे आहे. या व्हिडियोला म्यूझिकही त्याचप्रकारे लावण्यात आले आहे. या पोस्टला तिने स्टोरी ऑफ माय लाइफ अशी कॅप्शनही दिली आहे. व्हिडियोमध्ये तिने नेहमी मी भात खाते तेव्हा असेही म्हटले आहे. तिच्या या व्हिडियोला बरेच लाइक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी कमेंटस केल्या असून त्यांचे भाताबद्दलचे प्रेम आणि वजन वाढण्याची चिंता बोलून दाखवली आहे. अभिनेता रितेश देशमुख यानेही सानियाच्या या पोस्टवर कमेंट केली असून त्याने हिलेरियस म्हणजेच किती गंमत आहे असे म्हटत तिची चेष्टा केली आहे. सानिया सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय असून ती सतत आपले काही ना काही फोटो आणि व्हिडियो पोस्ट करत असते. 

( Image : Google)

आता भात खाल्ल्याने खरंच इतकं वजन वाढतं का हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर भात खाणे चुकीचे नसून भात खाण्याची पद्धत चुकीची असू शकते. भात तेल, बटर यामध्ये परतून खाणे योग्य नाही. भाताच्या वर तूप घालून खाल्ल्यास त्याचा फारसा त्रास होत नाही. भात हा वरण किंवा भाजीसोबत खाल्लेला जास्त चांगला. जास्त पॉलिश केलेल्या तांदळाचा भात खाणे योग्य नाही. तसेच आपण दिवसभरात किती भात खातो हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या आवडीचा भात तुम्ही नक्की खाऊ शकता पण त्यासाठी काही नियम पाळणे गरजेचे आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नसानिया मिर्झाइन्स्टाग्राम