Join us

Sheikh Hamdan : दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान यांना कन्यारत्न; लेकीचं नाव ठेवलं 'हिंद', कारण आहे खूपच खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:31 IST

Sheikh Hamdan : दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला आहे.

दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला आहे. ते चौथ्यांदा बाबा झाले आहेत. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मुलीचं नाव 'हिंद' असं ठेवलं आहे. याआधी या शाही जोडप्याला दोन मुलं आणि एक मुलगी देखील आहे. शेख हमदान हे २००८ पासून दुबईचे क्राउन प्रिन्स आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेख हमदान यांनी त्यांच्या आई शेखा हिंद बिंत मकतूम बिन जुमा अल मकतूम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या मुलीचं नाव 'हिंद' असं ठेवलं आहे. शेख हमदान हे दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम आणि शेखा हिंद बिंत मकतूम बिन जुमा अल मकतूम यांचे दुसरे पुत्र आहेत.

शेख हमदान हे सोशल मीडियावरही खूप एक्टिव्ह आहेत. इनस्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल १७ मिलियन आहे.  @faz3 या हँडलवरील पोस्टद्वारे ते त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षण शेअर करत असतात. शेख हमदान यांनी २०१९ मध्ये शेखा बिंत सईद बिन थानी अल मकतूम यांच्याशी लग्न केलं. शेखा या दुबईच्या सत्ताधारी अल मकतूम कुटुंबातील आहे. 

राजेशाही जीवन जगत असूनही त्या प्रसिद्धीपासून दूर राहतात. या शाही जोडप्याला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. शेखा आणि राशिद या जुळ्या भावांचा जन्म मे २०२१ मध्ये झाला. तसेच फेब्रुवारी २०२३ मध्ये एका मुलाचा जन्म झाला, ज्याचं नाव मोहम्मद बिन हमदान बिन मोहम्मद अल मकतूम असं आहे.

टॅग्स :दुबईसोशल व्हायरल