दसरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती झेंडूची केशरी आणि पिवळ्या रंगाची फुलं आणि आपट्याची पानं. बऱ्याच ठिकाणी या फुलांना गोंडे म्हणून ओळखले जाते. गोड्यासारखी दिसणारी अतिशय आकर्षक अशा या फुलांना या दशमीच्या दिवशी विशेष महत्त्व असते. घराला, ऑफीसला तोरण म्हणून, देवाच्या फोटोला आणि गाडीलाही या फुलांचा हार आवर्जून घातला जातो. विकतचे हार आणण्यापेक्षा घरच्या घरी हार करण्याला काही कुटुंबांमध्ये आजही तितकेच महत्त्व आहे. विकतचे हार तुलनेनं महाग असतात. इतकेच नाही तर ते विरळ आणि मनासारखे नसल्याने घरी केलेला भरगच्च हार देखणा दिसतो. आपल्याला हार करायचा म्हटला की एखादीच पद्धत माहित असते. काही वेळा हार करायला आपल्याला बराच वेळही लागतो. मात्र हार करायच्या काही सोप्या पद्धती शिकून घेतल्या तर आपले काम सोपे होते आणि घर किंवा गाडी, देवाचा फोटो छान सजतो. चला तर मग पाहूयात हार करण्याच्या 2 सोप्या पद्धती (Dasra Special How to Make Marigold Flowers Garland Zendu Har)...
१. दोन सुयांचा हार
२ जाडसर सुया किंवा दाभण आणि जाडसर दोरा घेऊन केशरी रंगाची आणि पिवळ्या रंगाची झेंडुची फुले घ्यावीत. त्याच्या मध्यभागी घालायला आंब्याच्या डहाळ्या घ्याव्यात. दोन्ही सुयांमध्ये दोरा ओवून घ्यावा. दोन्ही सुया एकसारख्या पकडून दोन्ही दोरे एकत्र करुन त्यांची गाठ मारुन घ्यावी. मध्यभागी हाराला जो गुच्छ असतो तो करण्यासाठी पाकळ्यांचा भाग खाली घेऊन त्यातून दोन्ही सुया घालाव्यात. आपल्याला आवडेल त्या कॉम्बिनेशनची आवडतील तितकी फुल घालून झाल्यावर आंब्याची ५ पाने घेऊन ती एकमेकावर पसरुन त्याच्या मध्यभागी दोन्ही सुया घालाव्यात. त्यानंतर दोन्ही सुया आणि दोरे वेगळे करुन देठाच्या बाजूने फुले दोऱ्यामध्ये घालावीत. यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण पांढरी किंवा शेवंतीची आणखी वेगवेगळ्या रंगाची फुलेही घालू शकतो.
२. मध्यभागी गोंडा असलेला हार
एका सुईवरही अतिशय झटपट असा हार बनवता येतो. यासाठी सुईमध्ये पिवळ्या रंगाची ४ फुले दोठाच्या बाजुने घालून घ्या. त्यानंतर केशरी रंगाचे फूल, कोणताही हिरव्या रंगाचा पाला आणि एखादे अॅस्टरचे फूल घालून ते दोऱ्यामध्ये घाला. हे सगळे पुन्हा एकदा रिपीट करा. मध्यभागी दोऱ्याचा थोडा भाग मोकळा ठेवून उलट्या बाजुने पुन्हा याच क्रमाने सगळे रिपीट करा. आता फुले देठाच्या बाजुने न घालता गोंड्याच्या बाजुने घाला. मध्यभागी जिथे जागा सोडली होती तिथे झेंडू, अॅस्टर आणि पाला यांचा एक गोंडा करुन घ्या. त्यानंतर आपल्याला आवडतील असे २ लहान गोंडे करा आणि ते हाराच्या मध्यभागी जोडा. विकतसारखा अतिशय सुंदर असा हार तयार होतो.