Join us  

स्वयंपाक झटपट होण्यासाठी ३ टिप्स, स्वयंपाक होईल चविष्ट-अन्न वायाही जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2023 2:13 PM

Easy and Important Kitchen Tips : हे साध्य कसं करायचं आणि त्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या पाहूया....

महिलांना झोपेतून उठल्यापासून स्वयंपाकाच्या कामाचे टेन्शन असते. मदतीला कोणी असेल तर ठिक नाहीतर सकाळी उठल्यापासून घरातील सगळ्यांचा चहा, नाश्ता, स्वयंपाक, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, डब्याची गडबड असे सगळे एकामागे एक असते. अनेकदा इतका गोंधळ असतो की आपल्याला काहीच सुचत नाही आणि मग नेहमीच्याच कामाला खूप जास्त वेळ लागतो. मात्र असे होऊ नये आणि आपले स्वयंपाकाचे काम सोपे व्हावे यासाठी काही सोप्या पण अतिशय महत्त्वाच्या अशा टिप्स आज आपण पाहणार आहोत. यामुळे स्वयंपाक तर चविष्ट होईलच आणि त्यामुळे आपलाही फार त्रागा होणार नाही. आता हे साध्य कसं करायचं आणि त्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या पाहूया (Easy and Important Kitchen Tips)...

१. घाईच्यावेळी एखाद्या भाजीला किंवा आणखी कोणत्या पदार्थासाठी आलं लसूण पेस्ट लागेल म्हणून आपण काही वेळा ती थोडी जास्तीची करुन ठेवतो. काहीवेळा आपण ही पेस्ट एकत्र करतो तर काही वेळा वेगवेगळी करुन ठेवतो. ही पेस्ट बंद ड्ब्याच ठेवली तरी ती थोडी वाळल्यासारखी होते आणि त्याचा रंगही बदलतो. मात्र असे होऊ नये म्हणून ही पेस्ट डब्यात ठेवताना त्यामध्ये चमचाभर तेल घालून ठेवल्यास ती अगदी आहे तशी राहते. 

२. बरेचदा आपण फ्रिज उघडला की त्यातून एकप्रकारचा विचित्र वास येतो. आपण दिवसभर विविध कारणांसाठी वापरत असलेला फ्रिज कितीही स्वच्छ ठेवला तरी त्यातून असा वास का येतो हे मात्र आपल्याला काही केल्या कळत नाही. अशावेळी एका कापसाच्या बोळ्यावर व्हॅनिला इसेन्स घालून तो बोळा फ्रिजमध्ये ठेवल्यास हा वास कमी होण्यास मदत होते. 

३. डोसा किंवा इडलीचे पीठ उरले की आपण ते तसेच फ्रिजमध्ये ठेवून देतो. मात्र हे पीठ एकतर कोरडे पडते किंवा ते जास्त आंबते. असे पीठ एकतर जास्त आंबट लागते आणि त्यामुळे अॅसिडीटीही होण्याची शक्यता असते. मात्र असे होऊ नये म्हणून त्यामध्ये २ ते ३ मिरच्या घालून ठेवल्यास पीठ आहे तसे राहण्यास चांगली मदत होते. 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.