आपण राहतो ते घर स्वच्छ असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण घरात सतत धूळ येते. आपण घर झाडतो, पुसतो, फर्निचर पुसतो तरी घरातील प्रत्येक गोष्टीवर धूळ आणि जळमटं बसतातच. आरोग्यासाठी ही धूळ अजिबात चांगली नसते. अनेकदा धुळीमुळे अॅलर्जी होते, तर कधी सर्दी-खोकला, श्वसनाचे त्रास होण्याचीही शक्यता असते. घरातील कानाकोपऱ्यात साचलेली धूळ, जळमटे काढणे आणि घराची स्वच्छता करणे हे एक मोठे काम असते. हे काम कितीही वेळा केले तरी कमीच पडते (Easy Cleaning Hack How To Clean Dust Form Home).
अनेकदा आपण फक्त ओल्या फडक्याने किंवा साबणाच्या पाण्याने ही धूळ साफ करतो. मात्र ती वारंवार बसते आणि आपल्याला सतत साफसफाई करावी लागते. अशावेळी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून धूळ साफ होण्यासाठी एक सोपे मिश्रण तयार केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. फर्निचर, शोभेच्या वस्तू किंवा टेबल पुसण्यासाठीही हे मिश्रण अतिशय फायदेशीर ठरते. आता हे मिश्रण कसे तयार करायचे आणि कसे वापरायचे याची एक सोपी हॅक आपण आज पाहणार आहोत. ज्यामुळे धूळ झटपट आणि चांगल्या पद्धतीने साफ होईल. पाहूया हा उपाय कोणता...
१. एका बाऊलमध्ये अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईल घ्यायचे.
२. १ चमचा व्हिनेगर आणि त्यात अर्धा कप पाणी घालून सगळे एकत्र करायचे.
३. या मिश्रणात २ थेंब डीश सोप घालायचा.
४. यामध्ये १० थेंब लिंबाचे इसेन्शियल ऑईल घालायचे.
५. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये घालायचे.
६. आपल्याला फर्निचर पुसायचे असेल तेव्हा कपड्यावर या स्प्रे बाटलीने स्प्रे करुन मग फर्निचर पुसावे.
७. आठवड्यातून एकदा जरी या मिश्रणाचा धूळ पुसण्यासाठी वापर केला तरी धूळ निघून जाण्यास त्याची चांगली मदत होते.