गेल्या काही वर्षांत विळी मागे पडली आणि भाज्या, फळं कापण्यासाठी चॉपिंग बोर्डचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. वापरायला सोपे असल्याने आणि उभ्या उभ्या झटपट काम होत असल्याने चॉपिंग बोर्ड वापरणे सोयीचे वाटू लागले. हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चॉपिंग बोर्ड मिळतात. यात लाकडी, प्लास्टीकचे, मेटलचे अशा विविध प्रकारांचा समावेश असतो. यामध्येही विविध आकार, प्रकार पाहायला मिळतात. पण प्लास्टीकपेक्षा लाकडाचा चॉपिंग बोर्ड वापरणे आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले असते. प्लास्टीकवर कापताना प्लास्टीकचे कण अन्नात जाण्याची शक्यता असल्याने लाकडी चॉपिंग बोर्ड वापरणे जास्त चांगले असते. वापरायला सोयीचा असला तरी हा चॉपिंग बोर्ड स्वच्छ ठेवावा लागतो (Easy hack to clean wooden chopping board).
ज्याप्रमाणे स्वयंपाकात वापरलेली भांडी स्वच्छ घासतो आणि मगच ती पुन्हा वापरतो, त्याचप्रमाणे चॉपिंग बोर्डही वेळच्या वेळी योग्य पद्धतीने साफ करायला हवा. लाकडाचा असल्याने हा बोर्ड पाण्याने धुतल्यानंतर त्यावर काही काळाने काळे डाग पडायला लागतात आणि एकप्रकारचे किटण जमा झाल्यासारखे दिसते.पुन्हा त्याच बोर्डवर काही कापले तर हे किटण आपल्या पोटात जाण्याची शक्यता असते. साध्या साबणाने हा बोर्ड घासला तरी अनेकदा हे काळपट डाग जात नाहीत. आरोग्यासाठी काळा झालेला हा बोर्ड वापरणे चांगले नसते. मग हा बोर्ड नेमका साफ कसा करायचा ते आपल्याला समजत नाही. म्हणूनच आज आपण लाकडाचा चॉपिंग बोर्ड साफ कसा करायचा याची सोपी ट्रिक पाहणार आहोत.
साफ करण्याची पद्धत...
१. सगळ्यात आधी लाकडाच्या बोर्डवर मीठ पसरुन घ्या.
२. लिंबू अर्धे कापून त्यावरही थोडे मीठ घाला.
३. हे मीठ लावलेले लिंबू काळपट झालेल्या चॉपिंग बोर्डवर सगळीकडून फिरवा.
४. त्यानंतर कोणत्याही घासणीने एकदा हलक्या हाताने घासून घ्यायचे.
५. मग गरम पाण्याने हा बोर्ड धुवायचा, जेणेकरुन त्यावरचे जंतू निघून जाण्यास मदत होईल.
६. त्यानंतर हा बोर्ड पूर्णपणे कोरडा होईपर्यंत चांगला वाळवावा आणि मग वापरावा.