ऑक्टोबर महिना म्हणजे पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधला कालावधी. या काळात कडक ऊन पडते त्यामुळे आपण त्याला ऑक्टोबर हिट म्हणतो. पण गेल्या काही वर्षात ऑक्टोबर महिन्यातही ऊन्हासोबत पाऊस पडतो. अशा दमट हवामानाचा आपल्या आरोग्यावर परीणाम होत असतो. या दमटपणामुळे घरातील अन्न-धान्याला बुरशी लागते. घरात एकप्रकारचा ओलसरपणा किंवा कुबटपणा राहतो. त्यामुळे किटक, मुंग्या, डास यांच्यासाठी हा कालावधी अतिशय पोषक असतो. अशावेळी ओट्यावर किंवा कुठेही ठेवलेली फळं आणि भाज्या यांच्यावर सतत चिलटं, माश्या घोंगावतात. घरात जिथे तिथे डास दडून बसलेले दिसतात. त्यांना पाहून आपल्याला एकतर किळस येते आणि आरोग्याच्या दृष्टीनेही ते अजिबात चांगले नसते. त्यामुळे ही चिलटं आणि माश्या सतत येऊ नयेत यासाठी काही सोपे उपाय पाहूयात (Easy home remedy for removal of insects, mosquitoes)...
१. फळं ज्या बास्केटमध्ये ठेवली आहेत त्या बास्केटला बाजुने व्हिनेगर लावून ठेवावे.
२. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालायचे. हे पाणी कोपऱ्यांमध्ये स्प्रे करायचे त्यामुळे कोळी जाळे करत नाहीत.
३. ओट्यावर, सिंकपाशी किंवा घरात कुठेही सतत मुंग्या होत असतील तर जिथे मुंग्या होतात तिथे हळद पसरावी, मुंग्या निघून जाण्यास मदत होते.
४. पाण्यात तमालपत्र, दालचिनी आणि बोरीक अॅसिड मिसळावे. हे पाणी एका स्प्रे बाटलीमध्ये भरुन ते ठिकठिकाणी स्प्रे करावे. यामुळे घरातील झुरळांचा नायनाट होण्यास मदत होते.
५. घरात कापूर जाळल्याने माश्यांचा बंदोबस्त होण्यास मदत होते.
६. पाण्यात मिरपूड घालून त्याचे पाणी स्प्रे केले तर पाली पळून जातात.
७. डासांचा नायनाट करण्यासाठी घरात कडुलिंबाची पानं जाळण्याचा उपाय अवश्य करावा.
८. किचन ओट्यावर सतत झुरळं, मुंग्या, चिलटं येत असतील तर एका लहानशा वाटीत लवंग ठेवायचे.
९. फ्रिजमधला ठेवणीचा वास आणि बुरशी निघून जाण्यासाठी एका बाऊलमध्ये बेकींग सोडा ठेवायचा.
१०. घरात उंदीर येत असतील तर त्याठिकाणी कांद्याचे स्लाईस करुन ठेवायचे. यामुळे उंदीर पळून जातात.