मुंग्या, झुरळं, पाली हे घरातील न बोलवता येऊन राहणारे किटक असतात. किचनमध्ये प्रामुख्याने सिंकच्या आसपास, ओट्यावर, अन्नाच्या आजुबाजूला, ट्रॉलीमध्ये या मुंग्यांची रांगच्या रांग तयार झालेली दिसते. कधीकधी ही रांग इतकी लांब असते की ती एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेलेली असते. या मुंग्यांमध्येही बरेच प्रकार पाहायला मिळतात. कधी त्या अगदी बारीक असतात तर कधी मोठ्या आकाराच्या असतात. काहीवेळा बागेत किंवा मैदानात असणाऱ्या लाल चावणाऱ्या मुंग्याही घरात होतात. गारठा शोधण्यासाठी किंवा खाद्य शोधण्यासाठी एखाद दोन मुंग्या आल्या की त्या कधी वेगाने वाढत जातात आपल्यालाही कळत नाही.
बऱ्याचदा ओटा किंवा टेबलवरच्या पदार्थांना या मुंग्या लागलेल्या असतात आणि तो पदार्थ रात्रीत त्या अतिशय शांतपणे खात असतात. अशाप्रकारे खायच्या पदार्थाला मुंग्या लागल्या की तो पदार्थ खायची इच्छा होत नाही. इतकेच नाही तर या मुंग्या अंगावरही चढतात आणि त्या चावल्याने खाज येणे, फोड येणे अशा समस्याही उद्भवतात. वेळच्या वेळी त्यांच्यावर योग्य ते उपाय केले नाहीत तर त्या ठाण मांडून आपल्या घरातच राहतात आणि संख्या वाढवतात.बरेचदा मुंग्या कमी होण्यासाठी आपण मीठ, सोडा, हळद, तिखट टाकून ठेवण्यासारखे घरगुती उपाय करतो. पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. त्यासाठीच आज आपण एक सोपा उपाय पाहणार असून यामुळे मुंग्या कायमच्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
१. पेपरमिंट एसेंशियल ऑईल हा मुंग्या जाण्यासाठी अतिशय उत्तम उपाय ठरू शकतो.
२. या तेलाला असणाऱ्या एकप्रकारच्या उग्र वासामुळे मुंग्या घरातून निघून जाण्यास मदत होते.
३. यासाठी कापसाचे लहान आकाराचे बोळे करून त्यावर या तेलाचे साधारण १० थेंब घालायचे.
४. हे कापसाचे बोळे घरात ज्याठिकाणी मुंग्या आहेत त्या त्या कोपऱ्यात, ओट्यावर, कचऱ्याच्या डब्यापाशी, बाथरुमपाशी ठेवायचे.
५. हा उपाय करायला अतिशय सोपा आणि कमीत कमी खर्चात होणारा असल्याने घरातील मुंग्यांना पळवून लावण्यासाठी आपण हा उपाय नक्कीच करू शकतो