बाथरुम ही घरातील अतिशय महत्त्वाची जागा असते. सकाळी उठल्यापासून आपल्याला आंघोळ करणे, हातपाय धुणे, कपडे धुणे, कपडे बदलणे अशा स्वच्छतेच्या गोष्टींसाठी बाथरुम लागतेच. वॉश बेसिन जर बाथरुममध्येच असेल तर बाथरुमचा वापर आणखीनच वाढतो. आजकाल जागा वाचवण्यासाठी टॉयलेट आणि बाथरुम एकत्रच करण्याची पद्धत आहे. त्यामुळे या बाथरुमचा वापर साहजिकच जास्त असतो. आंघोळ करताना, तोंड धुताना, कपडे धुताना किंवा बाकी कोणत्याही गोष्टी करताना याठिकाणी आपण साबणाचा वापर करतो (Easy home remedy to Remove Soap scum in bathroom).
हा साबण नीट साफ केला तरी त्याचे पांढरे डाग नळांवर, टाईल्सवर किंवा अगदी आरसा नाहीतर काचेवरही तसेच राहतात. हे पांढरे डाग घासून काढले तरच निघतात नाहीतर त्यांचे डाग बरेच दिवस तसेच राहतात, त्यामुळे बाथरुम अस्वच्छ वाटायला लागते. पण हे डाग वेळच्या वेळी निघून जावेत यासाठी घरच्या घरी १ सोपा उपाय केल्यास बाथरुम मस्त स्वच्छ आणि चकचकीत दिसण्यास मदत होते. पाहूयात हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा...
१. एका भांड्यात १ कप पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये १ कप व्हिनेगर घालायचे.
२. यामध्ये साधारण ४ चमचे डीश लिक्विड सोप घालायचा.
३. हे मिश्रण चांगले एकत्र करायचे आणि एका स्प्रे बाटलीमध्ये भरायचे.
४. ज्याठिकाणी साबणाचे पांढरे डाग आहेत अशा नळ, काच या वस्तूंवर हा स्प्रे मारायचा.
५. त्यानंतर एखाद्या मऊ अशा स्पंजने किंवा स्क्रबरने हे स्प्रे केलेले लिक्विड पुसून घ्यायचे.
६. मग हँड शॉवरने पाणी मारुन हा साबणाचा फेस साफ करायचा.
७. यामुळे अगदी ५ ते १० मिनीटांत आपली बाथरुम एकदम चकाचक दिसायला लागेल.
८. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास बाथरुम चकचकीत होण्यास याचा चांगला उपयोग होईल.