किचन ही आपल्या घरातील जास्त वावर असणारी खोली असते. सकाळी झोपेतून उठल्यावरच्या चहापासून ते रात्रीच्या दूधापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी किचनमध्ये होत असतात. किचन ओटा, ट्रॉली, कपाटं, शेल्फ, स्वयंपाकाची भांडी, किराणा सामान, सिंक अशा सगळ्याच गोष्टी या किचनमध्ये असतात. सततचा स्वयंपाक, फोडण्या, सांडलवंड, पाणी आणि ओला कचरा यांमुळे किचन अनेकदा खूप खराब होऊन जाते. रोजच्या धावपळीत सतत त्याची साफसफाई करणे आपल्याला शक्य होत नाही (Easy Kitchen cleaning tips).
पण त्यामुळे किचनच्या टाईल्स, ओटा, सिंक यावर राप चढत जातो आणि ते खराब होते. किचन अस्वच्छ असेल तर त्याठिकाणी होणाऱ्या माश्या, चिलटं आणि डास, झुरळं, मुंग्या यांमुळे आरोग्याच्या दृष्टीने ते अजिबात चांगले नसते. घाणीमुळे बॅक्टेरीयाचे साम्राज्य होते आणि मग आजार पसरण्याची शक्यता असते. म्हणून किचन वेळच्या वेळी साफ केलेले केव्हाही जास्त चांगले. किचन स्वच्छ करायचे म्हणजे प्रामुख्याने कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे ते पाहूया...
१. टाइल्स साफ करण्यासाठी वापरा कास्टीक सोडा
कास्टीक सोडा घेऊन त्यामध्ये लिक्विड डीश वॉश आणि व्हिनेगर टाकावे.हे सगळे चांगले एकत्र करुन हँड ग्लोव्हजचा वापर करुन ते ते मिक्स करायचे.कास्टीक सोड्याची ही पेस्ट स्क्रबरच्या मदतीने टाइल्सवर लावायची आणि साधारण २० ते ३० मिनीटांसाठी तशीच ठेवायची. त्यानंतर पाण्याने टाईल्स साफ कराव्यात. सोड्यामुळे चिकटपणा आणि घाण झटपट निघण्यास मदत होईल. हे झाल्यावर डिटर्जंट किंवा लिक्विड डीश वॉशच्या मदतीने सुती कापडाने या टाइल्स साफ कराव्यात.
२. साफसफाईचे नियोजन हवे
एक दिवस ओटा साफ केला, दुसऱ्या दिवशी गॅसची शेगडी साफ केली, तिसऱ्या दिवशी सिंक साफ केले, मग ट्रॉली, शेल्फ असे शेड्यूल ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे एक एक गोष्ट साफ करत राहा. या साफसफाईमध्ये नियमितपणा ठेवला तर याठिकाणच्या सगळ्या गोष्टी योग्य रितीने साफ होत राहतात.
३. सिंक साफ करण्यासाठी
सिंक साफ करण्यासाठी त्यामध्ये भरपूर व्हाईट व्हिनेगर टाकून ठेवावे. अर्धा तास यामध्ये पाणी किंवा इतर काहीच न घालता चांगले वाळू द्यावे. त्यानंतर पाण्याने सिंक साफ केल्यास ते छान चकाकते.