किचन ट्रॉली या आपल्या किचनमधील अतिशय सोयीची गोष्ट असते. भांडी, डबे, चमचे, कप अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहण्यासाठी आता घरोघरी किचन ट्रॉलीज असतातच. या ट्रॉलीज बाहेरुन कितीही स्वच्छ दिसत असल्या तरी आतून मात्र त्या सतत खराब होतात. या ट्रॉलीजमध्ये स्टील आणि टेंडम बॉक्स असे २ प्रकार पाहायला मिळतात. कितीही साफ केल्या तरी स्टीलच्या ट्रॉलीजमध्ये जळमटं, काहीतरी अडकणे, खाली घाण साठणे असं होतं. तर टेंडम बॉक्स हे बंद असल्याने यामध्ये तर पदार्थ सांडले की ते साचून राहतात (Easy Kitchen trolley cleaning tips).
एकदा घाण साठायला लागली की त्याठिकाणी लगेचच झुरळं, मुंग्या यांचा वावर सुरू होते. वेळच्या वेळी ही घाण स्वच्छ केली गेली नाही तर ही अस्वच्छता वाढत जाते आणि आरोग्यासाठी ते अजिबात चांगले नसते. त्यामुळे ट्रॉलीज समोरुन छान दिसण्यासाठी त्या आपण वारंवार पुसतो. आतूनही स्वच्छ केल्या तरी थोडे दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती येते आणि त्या खराब होतात.पण आतूनही ट्रॉली स्वच्छ राहाव्यात आणि आपलं काम सोपं आणि झटपट व्हावं यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...
१. ट्रॉलीज खराब होऊ नयेत आणि सहज साफ करता याव्यात यासाठी बाजारात प्लास्टीकसारखे एक कापड मिळते. ते ट्रॉलीजमध्ये खाली टाकले तर त्यावर सांडलेली घाण साफ करणे सोपे जाते. ट्रॉली शीट असे म्हटल्यास बाजारात किंवा ऑनलाईनही हे शीट सहज मिळतात. हे शीट काढून साफ करणे सोपे असल्याने ते अवश्य वापरायला हवेत.
२. अनेकदा ट्रॉली जुन्या झाल्या की त्याला गंज लागतो. त्यामुळे त्याचे मेटल दिवसेंदिवस खराब होत जाते. अशावेळी सगळी भांडी काढून कापसावर किंवा एखाद्या कपड्यावर खोबरेल तेल घेऊन हे फडके किंवा कापूस ट्रॉलीमध्ये फिरवा. त्यामुळे ट्रॉलीज चकचकीत दिसण्यास मदत होईल.
३. धूळ, घाण व्यवस्थित साफ होण्यासाठी बेकींग सोडा अतिशय उपयुक्त ठरतो. इतकेच नाही तर सोड्याच्या वापराने ट्रॉलीज खराब होण्याचीही शक्यता नसते. यासाठी एका बाऊलमध्ये ३ चमचे बेकींग सोडा आणि १ चमचा लिंबाचा रस घ्यावा. ही घट्टसर पेस्ट ट्रॉलीजवर ठिकठिकाणी लावून ठेवावी. काही वेळाने याचे बुडबुडे व्हायला लागतात, म्हणजेच पेस्ट आपले काम करते असे समजावे. मग एका ओल्या फडक्याने ट्रॉली स्वच्छ पुसून घ्याव्यात.
४. १ टेबलस्पून मीठ, २ टेबलस्पून व्हिनेगर आणि १ टेबलस्पून डिश वॉश लिक्विड एकत्र करावे. व्हिनेगर नसेल तर त्याऐवजी लिंबाचा रसही वापरू शकता. सगळ्यात आधी तर किचन ट्रॉली थोड्या ओलसर करून घ्या. नंतर वर सांगितलेले सगळे पदार्थ एकत्र करून मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण घासणीने ट्रॉलीवर लावा आणि थोडंसं घासा. ५ मिनिटे ते तसेच राहू द्या आणि त्यानंतर धुवून टाका. ट्रॉली लगेच स्वच्छ होतील.