घर स्वच्छ असलं की आपल्याला कसं प्रसन्न वाटतं. कोणी पाहुणे येणार असतील की आपण घराची साफसफाई करतो, त्याचप्रमाणे बाप्पा येणार म्हणूनही आपलं घर एव्हाना साफसफाईच्या शेवटच्या टप्प्यात आलं असेल (Window Cleaning Tips and Tricks). स्वच्छतेबरोबरच आरोग्याची काळजी म्हणून एव्हाना आपण घरातली जाळी-जळमटं काढली असतील. पण तरी ऐनवेळेची साफसफाईची काही कामं राहतातच. खिडक्यांच्या काचांवर कितीही साफ केलं तरी धूळ बसतेच. वारंवार खराब होणाऱ्या या काचा साफ करण्यासाठी काही सोपे उपाय समजले तर? पाहूयात खिडक्यांच्या काचा चकचकीत होण्यासाठीचे काही सोपे उपाय (Easy Methods for Cleaning Window Glasses)...
१. बेकींग सोडा
बेकींग सोडा हा साफसफाईच्या कामासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक आहे. घरातल्या खिडक्यांच्या काचा साफ होण्यासाठीीह बेकींग सोड्याचा उपयोग केला जातो. यासाठी थोडासा बेकींग सोडा एका मऊसूत कापडावर लावून त्याने काच पुसा. त्यानंतर पुन्हा एक सुती कापड घेऊन पाण्याच्या साह्याने खिडक्या साफ करणे गरजेचे आहे. यामुळे काचा एकदम चमकदार दिसण्यास मदत होईल.
२. व्हिनेगर
व्हिनेगरच्या साह्याने खराब झालेल्या काचा साफ होण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर भरुन घ्या. आता जेव्हा तुम्हाला काचा साफ करायच्या असतील तेव्हा हे स्प्रे बॉटलमधील व्हिनेगर खिडक्यांवर स्प्रे करा. त्यानंतर एखाद्या स्वच्छ सुती कपड्याने काचा पुसून घ्या. यामुळे काचांचा पारदर्शकपणा इतका छान होईल की समोर काच आहे की नाही हेही आपल्याला समजणार नाही.
३. डीश सोप
डीश सोप हा तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतोच. या साबणाने भांडी ज्याप्रमाणे चकचकीत आणि स्वच्छ होतात त्याचप्रमाणे काचाही अतिशय स्वच्छ होण्यास मदत होते. यासाठी हा साबण किंवा लिक्विड सोप आणि पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये एकत्र करा. काचांवर हे पाणी स्प्रे करुन चांगल्या फडक्याने काचा स्वच्छ पुसून घ्या.
४. मीठ
मीठ हा आपल्या स्वयंपाकातील एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. हाच पदार्थ काचा साफ करण्यासाठीही उपयुक्त ठरु शकतो. पाण्यात मीठ मिसळून हे पाणी खराब झालेल्या काचेवर टाका. त्यानंतर साध्या कपड्याने काचा स्वच्छ पुसून घ्या. मीठातील गुणधर्म स्वच्छतेसाठी अतिशय उपयुक्त असतात त्यामुळे काचा साफ करण्यासाठी मीठ एक उत्तम पर्याय ठरु शकते.