कांदा हा आपल्या स्वयंपाकातील एक महत्त्वाचा पदार्थ. कधी वाटणासाठी तर कधी फो़डणीला घालण्यासाठी नाहीतर वरुन घेण्यासाठी आपल्याला कांदा लागतोच लागतो. हा कांदा कापायचा म्हणजे एक जिकरीचे किंवा थोडे वेळ जाणारे काम असते. सोशल मिडीयावर अनेकदा अतिशय वेगाने किंवा एकसारखा मस्त कांदा कापण्याचे व्हिडिओ शेअर होत असतात. ते पाहून आपल्यालाही असा छान बारीक कांदा कापता यायला हवा असं आपल्याला वाटतं. मात्र विळीने किंवा चॉपरने ते काम आपल्याला हवं तसं जमतंच असं नाही. मग कधी कांद्यामध्ये एखादं साल येतं किंवा कांदा जाडसर कापला जातो (Easy Onion Cutting Hack).
कांदा दाताखाली आला की अनेकांना आवडत नाही आणि चिडचिड होते. अशावेळी बारीक आणि एकसारखा कांदा कापण्यासाठी आणि हे काम झटपट होण्यासाठी एक सोपी ट्रीक आज आपण पाहणार आहोत. मिसळ, पावभाजी, भेळ यांच्यावर घेण्यासाठी किंवा अगदी भाजी, आमटीला फोडणीत घालण्यासाठी हा बारीक चिरलेला कांदा एकदम परफेक्ट असतो. तसंच कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येतं आणि डोळ्यांची आगही होते त्यामुळेही आपल्याला कांदा चिरणे नकोसे वाटते. असा कांदा अगदी काही मिनीटांत कसा चिरायचा याची सोपी अशी एक ट्रीक पाहूयात...
१. कांद्याची सगळी सालं काढून घ्यायची. त्याचप्रमाणे खालच्या म्हणजेच देठाच्या बाजूचे टोक कापून घ्यायचे. यामुळे तो खालून सपाट होतो. आणि चॉपरवर चांगला बसतो. कांद्याच्या वरच्या बाजूला असलेले देठ कापायचे नाही तर ते हाताने धरायला तसेच ठेवायचे.
२. चॉपरवर कांदा ठेवून त्याला सगळ्या बाजुने जवळ जवळ उभे छेद द्यायचे. म्हणजेच सुरी उभी फिरवून उभ्या चकत्या कापून घ्यायच्या.
३. त्यानंतर हा कांदा आडवा करुन आडवी सुरी मारायची म्हणजे अतिशय बारीक एकसारखा चौकोनी कांदा चिरला जातो. अगदी छान एकसारखा बारीक कांदा मिळतो. वरुन कशावर कांदा घालून खायच असेल तर असा बारीक चिरलेला कांदा छान वाटतो.
४. यामध्ये कांद्याचे अर्धे भाग करणे, मग तो उभा कापणे हे सगळे वाचते. तसेच ओला कांदा असेल तर बरेचदा तो हातातून सटकतो आणि मग जाड कापला जातो. मात्र अशाप्रकारे कांदा कापल्याने तो सटकण्याची शक्यता थोडी कमी असते.