Join us  

नारळ फोडण्याची १ झटपट-सोपी ट्रीक, नारळीपौर्णिमेचा सण साजरा करणं होईल सोप्पं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2023 11:18 AM

Easy Simple Trick for Breaking Coconut Kitchen Hack : अगदी झटपट नारळाची करवंटी वेगळी होण्यास मदत होणारी ही ट्रीक कशी करायची पाहूया..

नारळीपौर्णिमा हा श्रावणात येणारा एक खास सण. नारळीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाला बहिण-भावाच्या नात्याचे विशेष महत्त्व असते. नारळीपौर्णिमा देशाच्या सर्व भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होते. मात्र कोकणात किंवा सागरी किनारपट्टीवर या सणाला विशेष महत्त्व असते. या दिवशी तोंड गोड करण्यासाठी आवर्जून नारळी भात, नारळाची वडी, करंजी, लाडू असे काही ना काही केले जाते. इतकंच नाही तर नारळाची चटणी, भाजीचे वाटण, एखाद्या पदार्थावर वरुन नारळाचा किस घेणे किंवा भाजी, आमटीत तरी आपण आवर्जून नारळाचा वापर करतो (Easy Simple Trick for Breaking Coconut Kitchen Hack). 

यासाठी नारळ फोडणे हे एक महत्त्वाचे काम असते. नारळाच्या शेंड्या काढणे, त्यानंतर तो फोडणे, खोबरे खोवणे अशा सगळ्या प्रक्रिया करुन हा नारळ वापरता येतो. हा नारळ फोडणे म्हणजे थोडे शक्तीचे काम असते. म्हणूनच नारळ फोडण्याची एक सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. यामुळे अगदी झटपट नारळाची करवंटी वेगळी होण्यास मदत होते. पाहूयात ही ट्रीक काय आहे आणि ती कशी करायची.  

१. नारळाच्या वरच्या सगळ्या शेंड्या काढून घ्यायच्या आणि त्यावर असणारे ३ डोळे सुरी किंवा स्क्रू ड्रायव्हरने फोडायचे.

२. या डोळ्यांतून नारळात असलेले पाणी काढून एका भांड्यात काढून घ्यायचे.

३. त्यानंतर हा नारळ मोठा गॅस लावून त्यावर ठेवायचा आणि दर १ ते २ मिनीटांनी फिरवत राहायचा. 

४. साधारण ३ ते ४ मिनीटांनी नारळ गरम झाल्याने करवंटीवर चिरा पडायला सुरुवात होईल. ५. नारळाची करवंटी वरच्या बाजूने पूर्ण काळी आणि गरम होईल. मग हा नारळ काढून एका पातेल्यात किंवा भांड्यात गार पाण्यात ठेवावा.

६. त्यानंतर ही करवंटी अगदी सहज निघून येते आणि खोबऱ्याची वाटी यातून काढता येते.  

 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.