बाथरुम ही आपल्या घरातील एक महत्त्वाची जागा. तोंड हात पाय धुण्यापासून ते आंघोळ, कपडे, भांडी अशी स्वच्छतेची बहुतांश कामं आपण या बाथरुममध्ये करत असतो. घरातील प्रत्येक व्यक्तीचा बाथरुममध्ये २-३ वेळा तरी वावर असतोच. आपण याठिकाणी आंघोळ करत असल्याने हे बाथरुम स्वच्छ ठेवणे अतिशय महत्त्वाचे असते. नाहीतर तिथल्या टाईल्स पिवळट पडतात, फरशी मेंचट झाली की पाय घसरतो. इतकंच नाही तर बाथरुमच्या जाळीपाशी हमखास चिलटं होतात. काही जण बाथरुम रोज, २ दिवसांनी घासतात. तर काही जण केवळ विकेंडला घासतात. पण फिनाईल टाकून बाथरुमच्या फरश्या आणि टाईल्स घासली तरी ही चिलटं सगळीकडे घोंघावत राहतात. नळावर, कपड्यांवर, बादल्या आणि मगांवर, भिंतींवर अशी सगळीकडे असणारी ही चिलटं नकोशी वाटतात. पण कितीही साफसफाई केली तरी ती काही केल्या जायचं नावच घेत नाहीत. मग ही चिलटं जाण्यासाठी नेमकं काय करावं पाहूया (Easy Solutions for Chilte Flies Problem)
...
१. अॅपल सायडर व्हीनेगर एका उंच बाटलीत भरून त्यात थोडासा लिक्वीड सोप टाकायचा. अॅपल सायडर व्हीनेगरच्या गोड-आंबुस वासाने चिलटं तिथे आकर्षित होतात आणि आत जाण्याचा प्रयत्न करतात आणि आत जाऊन मरतात. १-२ दिवसांनी हे मिश्रण फेकून पुन्हा नवीन भरून ठेवायचे.
२. बाथरुममध्ये भांडी घासणे, कपडे धुणे किंवा साफसफाईची कामे केली जातात. या कामांनंतर जाळीच्या आसपासचा भाग स्वच्छ केला गेला नाही तर त्याठिकाणी चिलटं जमण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतेही काम झाले की बाथरुम आणि ड्रेनेजची जाळी लगेच स्वच्छ करा.
३. बरणी किंवा अर्ध्या कापलेल्या प्लास्टिकच्या बाटलीत फळाची सालं किंवा अतिपक्व फळाचा तुकडा ठेवा. त्यावर थोडा व्हिनेगर टाकून ओलसर बनवा. कागदाचा शंकू करून तो बाटलीवर उलटा ठेवा. चिलटं शंकूतून फळाकडे आकर्षित होतात. एकदा आत गेल्यावर त्यांना पुन्हा बाहेर पडता येत नाही त्यामुळे तिथेच मरतात.