Join us  

पावसाळ्यात घरभर चिलटं झाल्याने हैराण झालात? ५ सोपे उपाय, चिलटांचा उपद्रव होईल बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2023 11:14 AM

Easy Solutions for Monsoon Chilte Flies Problem : चिलटं घालवण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी...

चिलटं ही पावसाळ्यात भेडसावणारी एक महत्त्वाची समस्या. फळं, भाज्या, ओट्यावरचा कचरा किंवा अगदी कोणत्याही गोष्टीवर पावसाळ्यात चिलटं घोंगावत असतात. ही चिलटं इतक्या जास्त प्रमाणात असतात की ती एकदम आपल्या अंगावर येतात. चिलटांची एकतर आपल्याला किळस वाटते आणि ती नकोशी होतात. अनेकदा ही चिलटं शरीराच्या जवळ येऊन आपल्याला गुदगुल्याही करत राहतात. चिलटं एका पदार्थावरुन दुसऱ्या पदार्थावर बसत असल्याने आरोग्यासाठी ती अतिशय हानिकारक असतात. ही चिलटं एकदा घरात आली की ती काही कमी व्हायचे नाव घेत नाहीत. अशावेळी चिलटं घालवण्यासाठी आवश्यक ते उपाय कोणते आणि ते कसे करायचे याविषयी समजून घ्यायला हवे (Easy Solutions for Monsoon Chilte Flies Problem ).

१. अ‍ॅपल सायडर व्हीनेगर एका उंच बाटलीत भरून त्यात थोडासा लिक्वीड सोप टाकायचा. अ‍ॅपल सायडर व्हीनेगरच्या गोड-आंबुस वासाने चिलटं तिथे आकर्षित होतात आणि आत जाण्याचा प्रयत्न करतात आणि आत जाऊन मरतात. १-२ दिवसांनी  हे मिश्रण फेकून पुन्हा नवीन भरून ठेवायचे. 

(Image : Google)

२. ज्यूसचे जार, केचप-सॉसच्या बाटल्या उघडल्यानंतर पुन्हा बंद करताना त्यांची तोंडे स्वच्छ पुसून घट्ट झाकण लावा. खरकटे अन्न, रस काढलेल्या फळांच्या साली, भाज्यांची देठे थोड्या वेळासाठीही घरात ठेवू नका.

३. सिंकचे ड्रेनेज स्वच्छ राहील याची काळजी घ्या. सिंकचे पाणी वाहून नेणारी पन्हाळी सुस्थितीत ठेवा. बाटल्या गरम पाण्याने, बाटल्या धुण्याचा ब्रश वापरून साफ करा. किचनमध्ये सांडलवंड झाल्यास लगेच साफसफाई करा. 

४. घरी कुठे पाणी साचले असेल, ओलसर जागा असेल तिथे ती जागा पुसून कोरडी करा. धुळ बसली असेल तर ब्लोअर वापरा. फरश्या पुसल्यानंतर ते पाणी लगेच बाहेर फेका. 

(Image : Google)

५. बरणी किंवा अर्ध्या कापलेल्या प्लास्टिकच्या बाटलीत फळाची सालं किंवा अतिपक्व फळाचा तुकडा ठेवा. त्यावर थोडा व्हिनेगर टाकून ओलसर बनवा. कागदाचा शंकू करून तो बाटलीवर उलटा ठेवा. चिलटं शंकूतून फळाकडे आकर्षित होतात. एकदा आत गेल्यावर त्यांना पुन्हा बाहेर पडता येत नाही त्यामुळे तिथेच मरतात.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्समोसमी पाऊस