आपल्या ओट्यावर आवर्जून तेलाची बुदली असते. पोळ्यांना लावायला तेल घेण्यासाठी, कढईत तेल ओतण्यासाठी आपण मोठ्या बरणीचा वापर न करता या बुदलीचा वापर करतो. ही बुदली कधी स्टीलची असते, कधी काचेची तर कधी प्लास्टीकची. या बुदलीला एकतर आपले खरकटे हात लागतात आणि त्यातही तेलाचे ओघळ आल्याने किंवा इतर अन्नपदार्थांचे काही ना काही उडाल्याने ती खराब होते. तेलाची बुदली चिकट आणि तेलकट झाली की आपल्याला ती वापरायला नको होते. हाताला चिकटपणा लागला की आपण ती घासायला टाकतो. बरेचदा याचा मेंचटपणा निघता निघत नाही आणि मग आपण ती पाण्यात भिजत टाकतो. तसेच याचे तोंड आणि आतला भागही निमूळता असल्याने ही बुदली आतल्या बाजुने घासता येत नाही. त्यामुळे ती आतमध्ये तेलकटच राहते. पण तेलाची बुदली आतून आणि बाहेरुन स्वच्छ-चकचकीत करायची असेल तर त्यासाठी आज आपण एक सोपा उपाय पाहणार आहोत (Easy steps to clean oil bottles) .
१. तेलाच्या खराब झालेल्या बाटलीमध्ये साधारण २ चमचे तांदूळ, २ चमचे व्हिनेगर आणि अर्धी वाटी पाणी घालायचे.
२. बाटलीचे तोंड बंद करून हे सगळे चांगले जोराने हलवायचे. आणि हे पाणी टाकून द्यायचे.
३. आता यामध्ये २ ते ३ थेंब डिश वॉश लिक्वीड आणि कोमट पाणी घालायचे.
४. हे मिश्रणही बाटली जोरात हलवून बाटलीमध्ये सगळीकडे जाईल अशा पद्धतीने हलवायचे.
५. हे मिश्रण सिंकमध्ये फेकून देऊन गरम पाण्याने बाटली २ ते ३ वेळा स्वच्छ धुवायची.
६. बाटली किंवा बुदली पूर्ण कोरडी करून, वाळवून मग त्यामध्ये पुन्हा तेल भरायचे आणि वापरायचे.
७. या ट्रिकमुळे बाटली आतून बाहेरून नीट स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्यावरचे किटणही निघून जाते.