दिवाळीपासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी साहजिकच गेले वर्षभर बॅगमध्ये असणारे आपले स्वेटर आपोआपच एव्हाना खाली यायला लागले असतील. उन्हाळा, पावसाळा या काळात स्वेटरची विशेष आवश्यकता नसल्याने आपण उबदार कपडे बॅगमध्ये घालून वरच्या बाजूला ठेवून देतो. बरेच दिवस बॅगमध्ये बंद राहील्याने या कपड्यांना एकप्रकारचा ठेवणीतला वास यायला लागतो. हे कुबट वास येणारे स्वेटर आपण अंगावर घातले तर आपल्या अंगालाही हा ठेवणीतला वास येतो. पण आता लोकरीचे स्वेटर धुवायचे म्हणजे त्यासाठी खूप जोर लागतो आणि ते वाळायलाही बराच वेळ लागतो. अशावेळी ठेवलेल्या स्वेटरला येणारा वास जाण्यासाठी नेमकं काय करायला हवं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आज आपण त्यासाठी काही सोपे उपाय पाहणार आहोत. यामुळे स्वेटरचा वास तर निघून जाईलच पण आपले स्वेटर एकदम नव्यासारखे वाटायला लागतील. पाहूयात हे उपाय कोणते (Easy Tips to remove smell from woolen cloths) ...
१. हाताने साफ करण्याची सोपी पद्धत..
डिटर्जंट पावडर हा कोणत्याही प्रकारचे कपडे साफ करण्यासाठीचा उत्तम उपाय असतो. लोकरीचे कपडेही या डिटर्जंट पावडरने अतिशय चांगल्याप्रकारे स्वच्छ होऊ शकतात. यामुळे त्यातील मळ तर निघून जाण्यास मदत होतेच पण कपड्यांना येणारा खराब वासही निघून जातो. यासाठी पाण्यात डिटर्जंट पावडर घालून त्यामध्ये हे वास येणारे कपडे साधारण अर्धा तास भिजवून ठेवायचे आणि मग ते बाहेर काढून साध्या पाण्याने धुवायचे. त्यामुळे ठेवणीतला वास निघून जाण्यास मदत होते.
२. इसेन्शिअल ऑईल
इसेन्शियल ऑईल हे एक अतिशय चांगले असे ऑईल असून यामुळे खराब वास जाण्यास निश्चितच मदत होते. त्यामुळे लोकरीच्या कपड्यांचा ठेवणीतला वास घालवण्यासाठी या तेलाचा चांगला उपयोग होतो. कोमट पाण्यात काही थेंब हे तेल घालायचे आणि लोकरीचे कपडे काही वेळासाठी यामध्ये भिजवून ठेवायचे. नंतर बाहेर काढून साध्या पाण्याने हे कपडे धुवायचे. हे कपडे नेहमीच्या कपड्यांपेक्षा थोडे नाजूक असल्याने त्यांना गरम पाण्याने धुण्यापेक्षा साध्या पाण्याने धुणे केव्हाही जास्त चांगले.
३. अल्कोहोलचा वापर
लोकरीचे कपडे साफ करण्यासाठी अल्कोहोलचा वापर केल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. अल्कोहोल हे पिण्यासाठी वापरले जाते इतकेच आपल्याला माहित आहे. मात्र अल्कोहोलचा वापर करुन लोकरीचे कपडे धुतल्यास या कपड्यांचा वास जाण्यास मदत होते. लोकरीच्या कपड्यांमध्ये वोडका घातल्यास कपड्यांचा ठेवणीतला वास निघून जाण्यास मदत होते.