आपण घरात स्वयंपाकाला विविध धातूंची भांडी वापरत असतो. यामध्ये स्टील, लोखंड, पितळ, ॲल्युमिनियम अशा बऱ्याच धातूंचा समावेश असतो. भांड्यांमध्ये स्वयंपाक केला की ती साफ करणे म्हणजेच घासणे हे एक महत्त्वाचे काम असते. भांडी स्वच्छ घासली जावीत यासाठी आपण ती खूप जोर देऊन घासतो किंवा महागाचे लिक्वीड साबण आणून भांडी स्वच्छ निघण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र तरीही भांड्यांवरचे तेलकट डाग, अन्नाचे राप म्हणावे तितके साफ होतातच असे नाही. अशा खराब भांड्यामध्ये पुन्हा स्वयंपाक करायला आपल्याला नको वाटते. अनेकदा तळलेली किंवा मसालेदार पदार्थ केलेली भांडी तर अजिबात स्वच्छ निघत नाहीत. अशावेळी ही भांडी घरच्या घरी काही सोप्या ट्रिक्स वापरून साफ केली तर जास्त चांगली स्वच्छ होतात. पाहुयात ॲल्युमिनियमची भांडी साफ करण्याची सोपी पद्धत (Easy trick to clean aluminum utensils)..
१. सगळ्यात आधी ॲल्युमिनियम च्या खराब झालेल्या कढई किंवा पातेल्यात २ चमचे बेकिंग सोडा घालावा.
२. त्यामध्ये १ चमचा मीठ घालावे.
३. यात एक चमचा लिक्वीड डिटर्जंट घालावे.
४. यावर अर्ध्या लिंबाचा रस पिळावा.
५. या सगळ्यावर पाणी घालून ते उकळावे आणि ५ ते ७ मिनिटे हे पाणी कढईत तसेच ठेऊन द्यावे.
६. या पाण्यासोबत कढईतील सगळी घाण निघून येण्यास मदत होईल.
७. मग ही कढई पुन्हा लिक्वीड सोपने चांगली घासावी यामुळे ॲल्युमिनियमची कढई चकचकीत होण्यास मदत होते.