पूर्वी स्वयंपाकघरात आवर्जून पितळ्याची, लोखंडाची आणि तांब्याची भांडी वापरली जायची. पण ही भांडी घासायला अवघड असल्याने कालांतराने ती मागे पडली. मग स्टेनलेस स्टील, अॅल्यूमिनिअम आणि इतर धातुंच्या भांड्यांना महिलांची पसंती मिळू लागली. पण गेल्या काही वर्षात जुनं ते सोन म्हणत अनेक घरात पुन्हा तांब्या-पितळ्याची भांडी विराजमान झाली. या धातूंमध्ये तयार केलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले असतात असं म्हणत आजीची किंवा आईची पितळ्याची भांडी वापरण्याकडे महिलांचा कल वाढला. पितळ्याची कढई, पातेले, डाव वजनाने जड आणि दिसायलाही तितकेच सुरेख असतात. या पितळ्याला ठराविक काळाने कल्हई करावी लागते (Easy trick to clean brass utensils).
या पितळ्याच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला तर ही भांडी घासणे हेही एक महत्त्वाचे काम असते. वेळच्या वेळी ही भांडी नीट घासली नाहीत तर त्यात खरकटे राहते तर कधी चिकटपणा आणि तेल यामुळे या भांड्यांवर राप चढतो. त्याच भांड्यांमध्ये पुन्हा पदार्थ करणे आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे वेळीच ही भांडी चांगली स्वच्छ घासली तर छान दिसतात आणि वापरण्यासाठी सुरक्षित असतात. तसेच आपल्या देवघरातही पितळ्याचे दिवे, देव, समई असे काही ना काही असतेच. पाहूयात पितळ्याची भांडी घासण्याची सोपी ट्रिक, जेणेकरुन खूप कष्टही पडणार नाहीत आणि वेळही वाचेल. मुख्य म्हणजे काही वेळात भांडी चकचकीत नव्यासारखी दिसण्यास मदत होईल.
१. पितळ्याचा बाहेरचा भाग पिवळ्या रंगाचा असतो. यावर वापरुन काळ्या रंगाचा राप चढतो.
२. या पिवळ्या भागावर मीठ घालायचे आणि लिंबाची फोड घेऊन ती या बाहेरच्या पिवळ्या भागावर चांगली फिरवायची.
३. मीठातील सोडीयम आणि लिंबातील सायट्रीक अॅसिड या रसायनांचे मिश्रण होऊन हा पिवळा भाग स्वच्छ चकचकीत होण्यास मदत होते.
४. तर त्याच लिंबाच्या सालाने म्हणजे लिंबाच्या पिवळ्या रंगाच्या सालाने कढई किंवा पातेल्याचा आतला कल्हई केलेला भाग घासायचा.
५. नंतर पाण्याने किंवा साध्या घासणीने हे पितळ्याचे भांडे साफ करायचे, ते एकदम चकचकीत दिसण्यास मदत होते.