Join us  

मायक्रोवेव्ह खराब-चिकट झाला, वास येतो? साफ करण्याची १ सोपी पद्धत, ५ मिनिटांत होईल चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2024 12:25 PM

Easy trick to clean dirty microwave oven : सांडलेले अन्न वेळच्या वेळी साफ केले नाही तर हा चिकटपणा साठत जातो

स्वयंपाकघरात काही वर्षांपूर्वी फ्रिज, मिक्सर या गोष्टी आल्या त्याचप्रमाणे आता मायक्रोवेव्ह ओव्हन ही गोष्टही सर्रास दिसू लागली. पदार्थ गरम करण्यासाठी, दाणे, रवा भाजण्यासाठी किंवा काही बेक करण्यासाठीही अनेक जण मायक्रोवेव्हचा वापर करु लागले. घाईच्या वेळी एखादी गोष्ट झटपट होण्यासाठी ही उपकरणे उपयुक्त असली तरी ती साफ करण्याचे एक महत्त्वाचे काम आपल्याला करावेच लागते. अगदी काही सेकंदात आपल्याला पदार्थ गरम करुन मिळत असल्याने आपण किमान पदार्थ गरम करण्यासाठी तरी मायक्रोवेव्हचा वापर करतोच. यामुळे वेळ वाचतो आणि अगदी लहान मुले किंवा वयस्कर व्यक्तीही आपल्याला हवे ते गरम करुन घेऊ शकतात. असे असले तरी घाईगडबडीत कधीतरी आपल्याकडून मायक्रोवेव्हमध्ये काही ना काही सांडते आणि तो खराब होतो (Easy trick to clean dirty microwave oven) . 

मायक्रोवेव्ह वापरणे सोपे असले तरी तो साफ करणे हे अनेकदा जिकरीचे काम असते. त्याचा आतला भाग तुलनेने लहान असल्याने आणि कोपरे असल्याने याठिकाणी सांडलेले चिकट, तेलकट अन्नाचे कण साफ करताना थोडी कसरत होते. हे सांडलेले अन्न वेळच्या वेळी साफ केले नाही तर हा चिकटपणा साठत जातो आणि मग कालांतराने मायक्रोवेव्हच्या आजुबाजूला झुरळं फिरताना दिसतात. आरोग्यासाठीही अशाप्रकारची अस्वच्छता चांगली नसल्याने ओव्हन वेळच्या वेळी नीट साफ करायला हवा. म्हणूनच आज आपण मायक्रोवेव्ह साफ करण्याची १ सोपी ट्रिक पाहणार आहोत. 

(Image : Google)

उपाय काय? 

१. एका काचेच्या बाऊलमध्ये २ कप पाणी घ्यायचे. 

२. त्यामध्ये १ चमचा लिक्विड सोप आणि साधारण अर्धी वाटी लिंबाचा रस घालायचा. 

३. हा बाऊल मायक्रोवेव्हमध्ये ठेवून ५ मिनीटांसाठी मायक्रोवेव्ह सुरू करायचा. 

४. हे भांडे १५ मिनिटांसाठी आतमध्ये तसेच ठेवायचे, भांड्यातील पाणी गरम झाल्याने त्याची आतमध्ये चांगली वाफ होईल. 

५. वाफेमुळे आतमध्ये असलेला चिकटपणा पटकन सुटून येण्यास मदत होईल. 

६. नंतर हे भांडे बाहेर काढून ओल्या स्पंजने किंवा सुती फडक्याने मायक्रोवेव्ह सगळ्या बाजुने पुसून घ्यावा. 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स