आपण कुठेही जायचे असेल की आधी तयारी करुन न ठेवता शेवटच्या क्षणाला सगळी शोधाशोध करायला लागतो. त्यामुळे आपल्याला नेहमीच आवरायला उशीर होतो आणि संबंधित ठिकाणी पोहोचायलाही उशीर होतो. त्यात आपल्याला साडी नेसून जायचं असेल तर मग विचारायलाच नको. साडीची निवड करण्यापासून ते मेकअप, हेअरस्टाइल अशा सगळ्याच गोष्टी असल्याने आपल्याला आवरायला खूप वेळ लागतो. आपण बरेचदा २ ते ३ साड्यांवर १ डीझायनर ब्लाऊज पेअर करतो. त्यामुळे मागच्या वेळी ते कोणत्या साडीवर घातलं होतं आणि कुठे ठेवलं होतं हे आपल्याला आठवत नाही (Easy Trick to fold saree in blouse).
तर घाईगडबडीत साडी एकीकडे आणि ब्लाऊज वेगळीकडेच ठेवलं गेलं असेल तर ते शोधण्यात खूपच वेळ जातो. सुरुवातीपासूनच असा वेळ जात राहीला तर आवरायला वेळ लागतो. त्यामुळे साडी नेसायची असल्यावर साडी आणि ब्लाऊज एकत्र सापडावे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आ ज आपण एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला ऐनवेळी शोधाशोध करावी लागणार नाही आणि बाहेर जाण्यासाठी तयार होताना सगळं जागच्या जागी मिळण्यास मदत होईल. इतकंच नाही तर गावाला जायचं असेल आणि बॅग भरायची असेल तरी हे साडी-ब्लाऊज घेणे अतिशय सोयीचे होते. पाहूयात ही सोपी ट्रिक कोणती आणि ती कशी वापरायची.
१. सगळ्यात आधी ब्लाऊजला पुढच्या बाजुने असलेली बटणं उघडायची.
२. यामध्ये साडीची उभट केलेली घडी घालायची.
३. त्यानंतर ब्लाऊजची बटणं लावून टाकायची आणि साडीची आपण नेहमी करतो त्याप्रमाणे घडी करायची.
४. ही घडी करताना आपण औषधांच्या गोळ्यांच्या पुडीत ज्याप्रमाणे एका बाजूचा कागद घालतो त्याप्रमाणे साडीची एक बाजू दुसऱ्या बाजूत घालायची.
५. अशाप्रकारे सगळ्या साड्या ब्लाऊजमध्ये गुंडाळून ठेवल्यास साडी आणि ब्लाऊज एकमेकांच्या सोबतच राहतात आणि ऐनवेळी शोधाशोध करावी लागत नाही.
६. याचा आणखी एक फायदा म्हणजे साडी आणि ब्लाऊज दोन्हीही चुरगाळत नाही. त्यामुळे ऐनवेळी साडी किंवा ब्लाऊजला इस्त्री नाही ही तक्रार उद्भवत नाही.