थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर प्रमाणात भाज्या मिळतात. या भाज्या ताज्या असताना अतिशय मस्त गोड लागतात. पण त्या वाळून जातात तशी त्याची चव जायला लागते. थंडीत बाजारात आवर्जून दिसणाऱ्या भाज्या म्हणजे मटार, गाजर. यामुळे आपण थंडीच्या दिवसांत पावभाजी, गाजर हलवा, गाजराच्या वड्या, मटारची उसळ, कचोरी असे एक ना अनेक प्रकार करतो. लाल चुटूक गाजरं खायलाही मस्त गोड लागत असल्याने या काळात आवर्जून भरपूर गाजरं आणली जातात. कडक असताना ही गाजरं खायला मस्तही लागतात. ही गाजरं २ ते ३ दिवसांत संपली तर ठिक नाहीतर ती लगेचच वाळायला सुरुवात होते. गाजर वाळले की त्याचा कडकपणा हळूहळू कमी होत जातो आणि ते मऊ पडते (Easy Trick to revive old Dried Carrot).
काळपट झालेले किंवा खालच्या बाजुने लुळे पडलेले गाजर खायला आपल्याला अजिबात आवडत नाही. मग अशी गाजरं टाकून देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. यामुळे पैसे तर वाया जातातच पण गाजरही वाया जातात. पण अशाप्रकारे वाळलेली गाजरं वाया जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर हीच मऊ पडलेली गाजरं पुन्हा ताजीतवानी करण्याचा एक सोपा उपाय आज आपण पाहणार आहोत. हा उपाय करायला अतिशय सोपा असून त्यामुळे गाजर आणि पैसे दोन्हीही वाया जाणार नाही. विशेष म्हणजे यामुळे मऊ झालेली गाजरं पुन्हा कडक होण्यास मदत होईल. आता हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा पाहूया...
१. मऊ पडलेली गाजरं एका आडव्या आकाराच्या गाजरं नीट बसतील अशा डब्यात ठेवायची.
२. ती पूर्णपणे पाण्यात बुडतील इतकं पाणी त्या डब्यात घालायचं.
३. हा डबा साधारण १२ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवायचा.
४. त्यानंतर डबा बाहेर काढल्यावर गाजरं पुन्हा पहिल्यासारखी कडक झालेली असतात.
५. अशी गाजरं आपण वरचं काळं पडलेलं साल काढून पुन्हा किसायला किंवा तुकडे करुन खायला अगदी सहज वापरु शकतो.
६. अगदी सोपी अशी ही ट्रिक वापरली तर गाजरं वाया न जाता ती खाता येऊ शकतात.