घरातल्या भाज्या पूर्ण संपल्या की आपल्याला आठवतो तो बटाटा. एखाद्या भाजीत भर घालण्यासाठी किंवा घट्टपणा आणण्यासाठीही बटाट्याची भाजी आवर्जून केली जाते. उपवासाच्या पदार्थांमध्ये किंवा अन्य कोणत्याही पदार्थासाठी आपल्याला बटाटा लागतो. बटाटा इतर भाज्यांप्रमाणे लवकर खराब होत नसल्याने आपण घरात थोडा जास्तीचा बटाटा आणून ठेवतो. पण अडीनडीला लागणारा हा बटाटा वापरला गेला नाही की तसाच पडून राहतो. प्रसंगी त्याला मोड येणे, हिरवे डाग पडणे किंवा तो मऊ होणे असे काही ना काही होते. अशावेळी फेकून कुठे द्यायचे म्हणून हे बटाटे आपण मोड काढून वापरतोच. मात्र अशाप्रकारे मोड आलेले बटाटे वापरणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते (Easy trick to store potato's from Rotting) .
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोंब येणे म्हणजे ती भाजी एका रासायनिक प्रक्रियेतून जात असल्याचे संकेत असतात. अशा रासायनिक प्रक्रिया झालेल्या भाजीचं सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. बटाट्याला कोंब फुटल्यानंतर त्यामधील कार्बोहाड्रेट म्हणजेच स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतर होते, असे झाल्यामुळे बटाटा नरमही होतो. सोलानिन आणि अल्फा कॅकोनिन नावाच्या दोन अल्कलॉइडच्या निर्मितीमुळे बटाट्यामध्ये हे बदल होतात. हे दोन्ही घटक आरोग्यासाठी घातक असतात. पण बटाट्याला मोड येऊ नयेत यासाठी १ सोपा उपाय केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो आणि बटाटे बरेच दिवस चांगले राहण्यास मदत होते. पाहूयात ही ट्रिक कोणती आणि ती कशी वापरायची.
१. वर्तमानपत्र किंवा कोणत्याही कागदाचे लहान आकाराचे तुकडे करायचे.
२. हे तुकडे बटाटे ठेवलेल्या टोपलीमध्ये बटाट्यांच्या मधे मधे घालून ठेवायचे.
३. कागदामध्ये बटाट्यातील आर्द्रता शोषली जात असल्याने बटाटे लवकर मऊ पडत नाहीत किंवा त्यांना मोडही येत नाहीत.
४. फळं जास्त काळ टिकावीत यासाठी फळविक्रेतेही हीच ट्रिक वापरताना दिसतात.
५. कोणत्याही ओलसर पदार्थामध्ये आर्द्रता निर्माण झाली की ते पिकण्याची आणि खराब होण्याची शक्यता असते.
६. पण कागदाची ही ट्रिक अतिशय सोपी आणि सहज करता येण्यासारखी असल्याने बटाटे जास्त काळ टिकण्यासाठी आपण ही ट्रिक नक्की वापरु शकतो.