ताजी फळं आहारात असायला हवीत असं आपण अनेकदा ऐकतो. थंडीच्या दिवसांत तर बाजारात फळं मोठ्या प्रमाणात असतात. फळांच्या माध्यमातून आपल्या शरीराला विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स, खनिजे, लोह, फायबर मिळतात. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी रोजच्या आहारात फळं असायलाच हवीत. आपण नियमितपणे केळी, चिकू, सफरचंद यांसारखी फळं खातो. मात्र काही फळं चिरायला किंवा खायला अवघड असतात म्हणून आपण ती फळं खाणं टाळतो. मात्र असे करणे योग्य नाही. त्यामुळे शरीराला त्या फळांमध्ये असणारे गुणधर्म मिळत नाहीत आणि आपल्या शरीराचे पुरेसे पोषण होत नाही. अननस, डाळींब, मोसंबी, किवी यांसारखी फळं आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. इतकेच नाही तर आरोग्याच्या कित्येक तक्रारींवरील उपाय म्हणूनही ही फळं आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र ती सोलण्यात वेळ जातो म्हणून आपण ती खाणे टाळतो (Easy Tricks of How To Peel Fruits).
पण फळं सोलण्याची किंवा चिरण्याची एखादी सोपी पद्धत आपल्याला माहित असेल तर आपला त्यामध्ये फार वेळ जात नाही आणि आपल्याकडून ही फळं नियमितपणे खाल्ली जातात. सोशल मीडियावर अशाप्रकारची माहिती देणारे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. ५ मिनिटस क्राफ्टचे व्हिडिओ आपण फेसबुक, इन्स्टाग्रामवर नेहमी पाहत असतो. त्यामध्येच फळं सोलण्याच्या सोप्या पद्धती सांगण्यात आल्या आहेत. युट्यूबवर हा व्हिडिओ शेअर करुन बराच काळ लोटला असला तरी आतापर्यंत जवळपास १.५ लाख जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
डाळींबाचे देढ काढून त्याला ४ काप दिल्यास त्यातील दाणे निघून येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे किवीचे साल एकदमच चिकटलेले असल्याने ते सोलणे अनेकदा आपल्याला अवघड होते. मात्र विशिष्ट पद्धतीने हे साल काढले तर मधला गराचा भाग सहज बाहेर येण्यास मदत होते. तसंच स्ट्रॉबेरी, मोसंब यांसारखी फळं सोलण्याच्या ट्रिक्सही यामध्ये सांगितल्या आहेत. त्यामुळे या ट्रीक्स पाहून आपण अवघड फळेही सहज सोलू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पाहा आणि फळं सोलण्याचे आपले काम सोपे करा.