पावसाळ्याच्या दिवसांत सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे कपडे वाळण्याची. बरेचदा सलग ४ ते ५ दिवस पाऊस पडत राहतो आणि सूर्यदेव दर्शनच देत नाहीत. अशावेळी हवेत एकप्रकारचा कुबटपणा किंवा दमटपणा राहतो. यामुळे कपडे काही केल्या वाळत नाहीत. फॅनखाली ठेवले तरी ते गार राहतात आणि कपड्यांना किंवा घरातही एकप्रकारचा कुबट वास फिरत राहतो. असे ओलसर किंवा वास येणारे कपडे चुकून अंगावर घातले गेले तर त्वचेला इन्फेक्शन होणे, खाज येणे अशा तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कपड्यांचा कुबट वास जावा आणि कपडे छान स्वच्छ फ्रेश व्हावेत यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत. या ट्रिक्सचा वापर केल्याने कपड्यांना कुबट वास न येता छान सुगंध येण्यास मदत होईल. पाहूयात हे पर्याय कोणते (Easy tricks to get rid of musty odur from clothes in Monsoon)...
१. गुलाब पाणी
गुलाब पाण्याला एक छान असा सुगंध असतो. साधारणपणे आपल्या घरात गुलाबपाणी सहज उपलब्ध असते. अनेकदा सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाणारे हे गुलाब पाणी घरात वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपयुक्त ठरु शकते. तसेच ते कपडे धुवून झाल्यानंतर खळबळताना किंवा पिळताना घातल्यास कपड्यांचा कुबट वास जाण्यास मदत होते. नैसर्गिक असल्याने याने काही त्रास होण्याचीही शक्यता नसते.
२. यु डी कलोन
या फ्रेंच फॉर्म्युलाने कपड्याला येणारा वास जाण्यास अतिशय चांगली मदत होते. हे कलोन आपण आंघोळीच्या पाण्यात. रुग्णाला साफ करण्याच्या पाण्यातही घालू शकतो. याचा मंद असा सुगंधाने अंगाला आणि कपड्याला फारच छान सुगंध येतो. अगदी २ ते ४ थेंब वापरले तरी हे कलोन फायदेशीर असते.
३. फॅब्रिक कंडीशनर
सध्या बाजारात कपड्यांना सुगंध यावा यासाठी फॅब्रिक कंडिशनर मिळतात. यामध्ये वेगवेगळ्या फुलांचे वास असणारे कंडीशनर असतात. कपडे खळबळताना हे कंडीशनर टाकले तर कपड्यांना अतिशय छान असा सुगंध येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत हे कंडिशनर आवर्जून वापरायला हवेत. त्याचा कपड्यांचा कुबटपणा जाण्यासाठी निश्चितच फायदा होतो.