उन्हाळ्यात शरीरातील पाणी पातळी कमी (dehydration) होत जाते. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून पाणीदार म्हणजेच पाण्याचं प्रमाण भरपूर असणारी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अशा प्रकारात येणारी टरबूज, खरबूज, काकडी अशी फळं आपण खातो आणि त्यांची सालं मात्र टाकून देतो. पण असं करणं चुकीचं आहे. कारण या फळांएवढीच त्यांची सालंही महत्त्वाची आहेत..(how to use fruit peels)
उन्हाळ्यात तळपायांची आग होणं. चेहरा, डोळे ओढल्यासारखे होणे, तळहातातून जणू उष्णता बाहेर टाकली जात आहे, असे वाटणे.... असे त्रास अनेक लोकांना होत असतात. शरीरातील उष्णता वाढली की असे त्रास व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच अशा पद्धतीचे त्रास कमी करण्यासाठी फळांची सालं अतिशय उपयुक्त ठरतात. म्हणूनच कोणत्या फळाचं साल कशा पद्धतीने वापरायचं, याची अचूक माहिती असणं गरजेचं आहे.
असा करा फळांच्या सालीचा वापर१. उन्हाळ्यात सगळ्याच घरांमध्ये खाल्लं जाणारं एक मुख्य फळ म्हणजे टरबूज. टरबूज (water melon) खातो आणि त्याची जाडजुड सालं मात्र आपण टाकून देतो. पण या सालांमध्येही पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे शरीराची वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. टरबुजाचा गुलाबी भाग काढून घेतल्यानंतर त्याची पांढरट हिरवी सालं तळपायाखाली ठेवा. किंवा तळपायांवर घासा. अतिशय शांत, थंड आणि रिलॅक्स वाटेल.
२. काकडीची (cucumber) कोशिंबीर हा उन्हाळ्यातला आणखी एक आवडता पदार्थ. कोशिंबीर नाही केली तर नुसती काकडी तरी अनेक जण खातातचं. काकडीची सालं काढून टाकणार असाल तर ती सालं तुमच्या चेहऱ्यावर, डोळ्यांवर काही मिनिटे पसरवून ठेवा. थंड वाटेल.
३. टरबुजाप्रमाणे खरबुजमध्येही (musk melon) पाणी पातळी भरपूर असते. पण तुलनेने खरबुजाचं सालं अगदीच पातळ असतं. हे साल तळहातांवर घासा. उष्णतेमुळे अंगाची होणारी लाहीलाही कमी झाल्यासारखे वाटेल.४. केळीची (banana) सालं देखील अतिशय गुणकारी असतात. ही सालं चेहऱ्यावर, तळपायावर, तळहातावर घासा. यामुळेही थंड, शांत वाटेल.