काहींना इतकं फास्ट जेवायची सवय असते की आपलं अर्धंही जेवण झालेलं नसताना या लोकांचं पूर्ण जेवण झालेलं असतं. अनेकदा कामाचा ताण किंवा जेवण उरकण्याची घाई ही यामागची कारणे असतात. तर काही लोक इतके निवांत जेवतात की २ पंगती उठल्या तरी यांचे जेवण काही होत नाही. अशावेळी हे लोक किती खातात असेही समोरच्यांना वाटू शकते. अशी समस्या असणारे लोक पंगतीत किंवा सार्वजनिक ठिकाणी जेवायला लाजतात किंवा टाळतात. कारण खूप वेळ एकटेच खात बसण्याची त्यांना लाज वाटू शकते (Eating Habit Reveal About Your Personality). तर काहींना एकदम बकाबका खाण्याची सवय असते. असे लोक आपण कुठे आहोत, आपल्यासमोर कोण आहे याचे भान ठेवत नाहीत. आपल्यातील अनेकांना हे माहित नसेल की आपल्या खाण्याच्या पद्धती आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे ते सांगतात. आपण जसे खातो तसे आपण वागतो असे प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट ज्युलिया हॉर्म्स सांगते. आपल्याला कशाप्रकारचे अन्नपदार्थ आवडतात आणि आपण ते कसे खातो यावर आपला स्वभाव सांगता येऊ शकतो असे तिचे म्हणणे आहे. पाहूया कसे खाणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो....
१. तुम्ही हळूहळू खाता?
तुम्ही कोणतीही गोष्ट नेहमी अतिशय हळूहळू खात असाल तर तुम्ही सगळ्या गोष्टी नियंत्रणात ठेवता. आयुष्यात मिळालेल्या क्षणांचे कौतुक कसे करावे ते या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहित असते. मात्र काही जण कधीतरीच हळू जेवतात, तेव्हा त्याचे कारण त्यांच्या अंगात पुरेशी ऊर्जा नसणे किंवा त्यांचा मूड चांगला नसणे हे असते.
२. तुम्ही भरभर खाता?
जे खूप भरभर जेवतात ते महत्त्वाकांक्षी आणि उतावीळ असतात. जे भरभर खातात ते मल्टीटास्कींग कऱणारेही असतात असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. हे लोक अतिशय चांगले जोडीदार असतात कारण त्यांचा स्वभाव हा देण्याचा असतो. या लोकांचा जेवण्याचा वेग हा त्यांच्या आयुष्यातील आनंदाशी मिळताजुळता असतो. म्हणजेच जे लोक वेगाने जेवतात ते आयुष्यात खूश असतात असे म्हणायला हरकत नाही. पण प्रमाणापेक्षा वेगाने जेवणे आरोग्यासाठी चांगले नसते. कारण त्यामुळे लठ्ठपणासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
३. तुम्हाला साहस करायला आवडते?
एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुम्हाला त्याठिकाणी मिळणारी अतिशय वेगळी डिश मागवायला आवडत असेल तर तुम्ही या कॅटेगरीमध्ये येता. जे लोक नवीन गोष्टी ट्राय करतात ते साहसी असतात आणि त्यांना रिस्क घ्यायला आवडते. विशेष म्हणजे ते अपयशाला घाबरत नाहीत. अशाप्रकारे खाण्याच्या बाबतीत साहस करणे तुमच्यातील नवीन गोष्टी ट्राय करण्याचा ओपननेस दाखवते. म्हणजेच तुम्ही कम्फर्ट झोन तोडून त्यापलिकडचे काहीतरी करता.
४. तुम्ही निवडक खाणारे आहात?
तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या हॉटेलमध्ये गेले तरी तुमच्या आवडीचे नेमके पदार्थच खायला आवडत असतील तर तुम्ही या गटात येता. कोणतेही प्रश्न न विचारता किंवा पदार्थामध्ये काही अॅड करायला किंवा कमी करायला सांगणे हे या प्रकारच्या लोकांसाठी नेहमीपेक्षा वेगळे असते. या पद्धतीचे लोक आपल्या कम्फर्टझोनमध्ये अतिशय सुरक्षित असतात. त्यांना पूर्णपणे माहित असलेलीच नोकरी ते स्वीकारतात. पण हे लोक कोणतेही धाडस करायला धजावत नाहीत कारण त्यांना अपयशाची भिती वाटते.
५. तुम्ही आयसोलेटेड असता?
खाण्याच्या प्रकारातील हा अतिशय असामान्य प्रकार आहे. हे लोक अतिशय पद्धतशीरपणे खातात. ताटातील एक पदार्थ संपल्याशिवाय ते दुसऱ्या पदार्थाकडे जात नाहीत. हे लोक जास्त डिटेलमध्ये विचार करणारे असतात असे म्हटले जाते. त्यामुळे या लोकांचे त्यांच्या कामावरुन किंवा वागणुकीवरुन कायम कौतुक होते आणि ते यशस्वीही होतात. त्यांच्यात भरपूर सहनशक्ती असल्याने ते समोरच्याचे म्हणणे ऐकून घेतात.