आपली आजी आणि पणजी यांच्या साड्या, दागिने हे आपल्यासाठी नेहमीच खूप खास असतात. त्याला आजीच्या शरीराचा एक गंध असतो आणि तिची मायाही त्यात भरलेली असते. आपल्या आजीची किंवा पणजीची साडी नेसणे किंवा त्यांचे पारंपारिक डिझाइनचे दागिने घालणे ही आपल्यासाठी एक पर्वणीच असते. एरवी हे ठिक आहे पण एका नवरीने आपल्या लग्नात पणजीच्या साडीचा काठ आपल्या साडीला लावत तिचा मायेचा स्पर्श सोबत घेऊन नवीन आयुष्यात प्रवेश केला. एकीकडे आपल्या लग्नासाठी लाखोंची खरेदी करणाऱ्या तरुणी आपण पाहतो. तर दुसरीकडे या नवरीने आपली पणजी आणि आजीच्या वस्तूंचा वापर करत आपला पारंपरिक लूक खुलवल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही वर्षात आपण अनेक अभिनेत्रींना किंवा तरुणींना आपल्या आईच्या लग्नातील साडी स्वत:च्या लग्नासाठी नेसताना पाहिले आहे. पण या नवरीने आपल्या लग्नाच्या महत्त्वाच्या दिवसासाठी पणजीच्या साडीच्या काठाचा वापर करुन हटके साडी तयार केली.
या तरुणीचे नाव तारीणी मानचंदानी असून तिने नुकतीच आपल्या स्वप्नातील राजकुमारासोबत लग्नाची गाठ बांधली आहे. आपले लग्न लोकांच्या लक्षात राहायला हवे असे वाटत असल्याने जास्तीत जास्त चांगली व्यवस्थाही करण्याचा दोन्ही कुटुंबांचा प्रयत्न असतो. तसेच आपला लग्नसोहळा खास असावा असे प्रत्येकालाच वाटते. हा लग्नसोहळा सर्वांच्या लक्षात राहावा यासाठी वधू-वरांचे कपडे, लूक, जेवण या सगळ्यांवर हल्ली बराच खर्चही केला जातो. पण तारीणी हिच्या लग्नात तिच्या क्रिएटीव्हीटीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. पणजीच्या साडीचा काठ वापरुन तिने आपल्या लाल रंगाच्या साडीला लावल्यामुळे त्या साडीचा आणि अर्थातच तिचा लूक एकदम खुलून दिसत होता. यामुळे ही नवरी आपल्या कुटुंबाशी भावनिकरित्या किती जोडलेली आहे हेही पाहायला मिळाले. तुम्हीही असे प्रयोग करुन आपला एखादा लूक नक्की करु शकता...
अशी तयार झाली तारीणी हिच्या लग्नाची साडी
या लाल रंगाच्या साडीचे शिफॉनचे कापड तारीणी हिच्या आईने १० वर्षापूर्वी पॅरीसहून आणले होते. या कापडावर पारंपरिक मुकाईश हँडवर्क करण्यासाठी ते त्यांनी लखनौला पाठवले. अगदी बारीक सोनेरी रंगाची बुट्टी केल्यावर या कापडाला एक मस्त पारंपरिक लूक मिळाला. नंतर त्या कापडाला पणजीच्या साडीचा एक जुन्या पद्धतीची डिझाईन असलेला पण अतिशय सुंदर असा काठ जोडून एक ही लग्नाची साडी तयार झाली. या साडीला हा काठ परफेक्ट मॅच झाल्याने हे जोडलेले आहे असे अजिबात वाटत नाही. यावर नवरीने घातलेल्या स्लिवलेस ब्लाऊजमुळे तिचा लूक आणखीनच खुलून आला.
अशी केली दागिन्यांची निवड
इतकी सुंदर साडी तयार झाल्यावर त्यावर सूट होतील असे दागिने तर हवेतच. पण या नवरीने लाखोंचे दागिने विकत न घेता आपल्या आजीचे आणि आईचे दागिने घालत आपल्या कुटुंबाशी असलेला कनेक्ट परफेक्ट जपला. गळ्यात आईच्या आईचे पारंपरिक नेकलेस आणि डोक्यावर बिंदी घातली. तर कानातले आईचे घातले. तर तिच्या पणजोबांकडून वंशपरंपरेने तिला कलेरा मिळाला. इतकेच नाही तर होणाऱ्या नवऱ्याच्या आजीची अंगठी घालत या नवरीने आपल्या नव्या घराशी होणारे नातेही जपल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्यावर तिने केलेला साधासा मेकअप आणि हेअरस्टाईल अगदीच सुंदर दिसत होती. केसांना फुलांची केलेली सजावट तिच्या सौंदर्यात भर घालणारी ठरली.