तरुणपणी तर आपल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला, अगदी होणारी बायको किंवा नवऱ्याला बाईकवरुन राईड मारुन आणणे अगदीच सामान्य आहे. पण जसजसे आपले नाते मुरत जाते तशी या गोष्टीची हौस कमी होते म्हणा किंवा आपल्या प्रयोरीटी बदलत जातात. त्यामुळे कामानिमित्तच आपण एकमेकांच्या मागे बसून प्रवास करतो. कधी काही सामान आणण्यासाठी तर कधी एखाद्या कार्यक्रमाला किंवा कामाला दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण शहरात किंवा शहराच्या आसपास बाईकवरुन फिरतो. पूर्वी बाईक किंवा गाडी चालवणारा मुलगा किंवा पुरुष असे गणित ठरलेले होते. मात्र आता अगदी चारचाकी आणि विमानही महिला चालवताना दिसतात (Elderly Woman Rides Motorcycle with Husband at the Backseat Viral Video).
तरुणी किंवा महिलांनी गाडी चालवणे आता काहीसे सामान्य आहे. मात्र आजीच्या वयाच्या एखाद्या महिलेने आपल्या वृद्ध पतीला डबल सीट घेऊन जाणे हे चित्र आजही काहीसे अपवादानेच पाहायला मिळते. नुकताच सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये एक महिला आपल्या वृद्ध पतीला डबल सीट नेताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही गाडीही लूनासारखी अतिशय जुनी असल्याचे दिसते. साडी नेसलेली ही महिला अतिशय व्यवस्थित गाडी चालवत आहे आणि तिचा काहीसा वृद्ध झालेला पती तिच्या मागे गाडीला घट्ट धरुन बसला आहे. या वयातही या दोघांचा स्वॅग पाहण्यासारखा आहे अशाप्रकारची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सुष्मिता डोरा नावाच्या एका फोटोग्राफरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून लोक त्याचे बरेच कौतुक करताना दिसत आहेत.
तेरे बीन...हे गाणे या व्हिडिओला जोडण्यात आल्याने तो आणखीनच रोमँटीक झाला आहे. तर या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हणले आहे, “सामान्यपणे आपण बाईकवर एखादे कपल पाहतो तेव्हा मुलगा गाडी चालवत असतो, पण या वयात असे काही तुम्ही कधी पाहिले आहे?” पोस्टच्या कॅप्शनमध्येही कपल गोल्स असे म्हणत हार्टची इमोजी टाकण्यात आली आहे. आतापर्यंत ३० लाखहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून ३ लाख जणांनी तो लाईक केला आहे. तर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हा दक्षिण भारतातील तमिलनाडूमधील व्हिडिओ असल्याचे काहींचे म्हणणे आहे तर ‘दक्षिण भारतात हे अतिशय सामान्य आहे’ असेही काहींनी म्हटले आहे. ‘हा व्हिडिओ खूप छान आहे’, ‘तिचा आपला असा एक स्वॅग आहे आणि तो खूप छान आहे’ असेही एकाने म्हटले आहे.