वीज कर्मचाऱ्यांचा संप, विजेचं वाढतं बील आणि खाजगी कंपन्यांचा वीज उद्योगातील सहभाग यामुळे महाराष्ट्रात वीज सध्या चांगलीच गाजत आहे. अशातच एका विजेच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही जुने फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी हॉटेलमधील जुन्या बिलाचे फोटो असतात तर कधी किराणा मालाच्या किमती सांगणारी बीले. पूर्वीच्या काळी घरात वीज नसली तरी तितकी अडचण व्हायची नाही. वीज ही अत्यावश्यक गोष्ट असल्याने आताच्या काळात वीजेशिवाय आपले एकही काम होऊ शकत नाही (Electricity Bill of 1940 Before Independence 83 Years old Slip Viral).
सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो ८३ वर्ष जुना असून १९४० मध्ये वीजेची किंमत काय होती हे यातून आपल्याला दिसत आहे. व्हायरल झालेले हे बील पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही याचे कारण म्हणजे पूर्ण महिन्याभराचे बील केवळ ५ रुपये आले आहे. काळानुसार महागाई वाढली त्याचप्रमाणे वीज, पेट्रोल, किराणा अशा सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढत गेल्या. त्यामुळे आताच्या काळात ५०० ते १००० रुपयांच्या दरम्यान वीजेचे बील येते. त्यामुळे या व्हायरल फोटोमधील बिलाची ५ रुपये किंमत पाहून नेटीझन्स आश्चर्य व्यक्त करत आहेत.
बिलाची तारीख १५ ऑक्टोबर १९४० असून ते बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय आणि ट्रामवे कंपनीचे बील आहे. यामधील आकड्यांनुसार महिन्याभरात केवळ ३.१० रुपये किमतीची वीज वापरली गेली आणि त्यावर टॅक्स लागल्यानंतर या बिलाची किंमत ५.२ रुपये इतकी झाली. आता वीजेची बिलं ज्याप्रमाणे प्रिंटेड असतात तसे त्यावेळी नव्हते. त्यामुळे वीज बिलही हाताने लिहीले जायचे. या बिलाची आताच्या बिलाशी तुलनाच होऊ शकत नाही याचे कारण म्हणजे आता एका युनिट वीजेची किंमत आपल्याला ५ रुपये इतकी मोजावी लागते. आमच्याकाळी इतीक महागाई नव्हती असे वाक्य आपण घरातील आजीकडून नेहमी ऐकतो. हे बील हे त्याचेच एक उदाहरण आहे.