सिंगल पॅरेन्ट असल्यावर आई आणि बाबा या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच पालकाला खंबीरपणे निभवाव्या लागतात. हे एका अर्थाने शिवधनुष्य पेलल्यासारखंच आहे.. अशीच काहीशी कथा आहे सेवानिवृत्त कर्नल संजय पांडे यांची. त्यांनी त्यांचा हा अनुभव सोशल मिडियावर शेअर केला आणि बघता बघता त्यांची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. एका पित्यामध्ये दडलेलं मातृहृदय यानिमित्ताने बघायला मिळाल्याने नेटकरीही भारावले आहेत.
संजय पांडे यांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर वर्षभरातच त्यांच्या मुलीने त्यांना ती आई होणार असल्याची गुडन्यूज दिली. गरोदरपणात एका स्त्रिला तिच्या आईची किती गरज असते, हे वेगळं सांगायलाच नको. गरोदरपणाच्या प्रत्येक टप्प्यापासून ते बाळ झाल्यानंतर त्याची काळजी घेण्यापर्यंत आई सोबत असावी, असं प्रत्येकीलाच वाटतं.. आपल्या लेकीलाही आईची कमतरता जाणवत असेल, हे त्यांनी अचूक हेरलं आणि स्वत:च तिची आई व्हायचं ठरवलं..
ते म्हणतात खरंतर या काळात मी माझ्या लेकीसाठी पुर्णपणे निरुपयोगी होतो. कारण या काळात जे एक आई करते ते एक पुरुष करू शकत नाहीच.. पण मग मी माझा विचार बदलला आणि लेकीची आई होण्याचं ठरवलं. लेक लंडनला आणि संजय पांडे दिल्लीला. कोरोनामुळे प्रवासावर बंदी होती. त्यामुळे त्यांना त्यांच्या लेकीकडे काही जाता येईना. मग इथे भारतात राहून तिला जशी जमेल तशी मदत करायची, हे त्यांनी ठरवलं.
नेटवर भरपूर शोध घेतला, खूप माहिती गोळा केली आणि लेकीसाठी छान पौष्टिक लाडू बनवले. हे लाडू तिच्यापर्यंत पोहाेचवायलाही भरपूर दिव्य पार पाडावं लागलं. गरोदरपणात लेकीला इतर काहीही खाण्याची इच्छा होत नव्हती. पण वडीलांच्या हातचा लाडू तिने चाखून पाहिला आणि मग हे लाडूच जणू काही तिच्या गरोदरपणात तिची ताकद बनले. जणू या लाडूमुळेच तिची तब्येत चांगली राहिली होती. पुर्ण नऊ महिने संजय तिला टप्प्याटप्प्याने लाडू पाठवत होते. या काळात भरपूर माहिती गोळा करून ते वेगवेगळे ११ प्रकारचे लाडू करायला शिकले. एवढंच नाही तर बाळांतपणानंतर आईला भरपूर दूध येण्यासाठी आहार कसा असावा, काय खायला द्यावं, हे देखील त्यांनी अचूकपणे शोधलं आणि लेकीसाठी तशी सगळी तयारी करून ठेवली. तिची गरज लक्षात घ्यायची आणि तिला जे लागेल ते पाठवायचे, असा त्यांचा दिनक्रम खरोखरंच त्यांच्यातल्या मातृत्वाची झलक दाखवून गेला.