लग्न म्हणजे आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण. याप्रसंगी आपल्यासोबत आपले आई- वडीलसुद्धा असावेत, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशीच इच्छा होती सुवन्या या नवरीची. पण दैवाच्या मनात काही वेगळंच होतं. सुवन्याच्या वडीलांचं काही महिन्यांपुर्वीच निधन झालं. वडील आता लग्नात प्रत्यक्ष आपल्या सोबत नसणार.. पण त्यांचा सहवास मात्र आपण अनुभवू शकू, अशी एक कल्पना तिला सुचली आणि तिने चक्क वडिलांनी तिला दिलेलं पत्रच तिच्या लग्नातल्या ओढणीवर छापून घेतलं.
सुवन्याचा हा व्हिडियो इन्स्टाग्रामवर (video on instagram) शेअर झाला असून तो कमालीचा व्हायरल झाला आहे. त्याचं झालं असं की सुवन्याचं नुकतंच राजस्थान येथे लग्न झालं. वडिलांच्या मृत्यूपुर्वी सुवन्याचा जो वाढदिवस झाला, त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला एक पत्र लिहिलं. तिच्या आणि त्यांच्या अनेक आठवणी, आयुष्यातील अनेक प्रसंग, भविष्याबाबत सुचना आणि मार्गदर्शन, अनेक भावभावना.. असं खूप काही त्या पत्रात होतं. वडिलांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं हे पत्र सुवन्यासाठी अतिशय अनमोल होतं..
त्यामुळे सुवन्याने या पत्राचा उपयोग अतिशय कलात्मकतेने केला आणि या पत्रातील काही अक्षरांचा, शब्दांचा वापर तिच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या ओढणीत केला. पत्रातील अक्षरं तिने काढली आणि ती तिच्या लग्नातल्या ओढणीवर एम्ब्रॉयडरी करून घेतली. ओढणीचा पुर्ण काठ तिने या पत्रातील अक्षराने सजविला आणि तिच ओढणी वडिलांचा आशिर्वाद म्हणून लग्न समारंभात डोक्यावर घेतली. यामुळे संपूर्ण सोहळ्यादरम्यान वडील आपल्या सोबतच आहेत, अशी भावना मनात दाटून येत होती, असंही तिने या व्हिडियोत सांगितलं आहे.
सुवन्याचा हा लेहेंगा आणि ओढणी सुकन्या खेरा यांनी डिझाईन केला असून तो खूपच साधा पण तरीही अतिशय लक्षवेधी आहे. चमकदार लाल रंगाचा लेहेंगा, लाल रंगाचं स्लिव्हलेस ब्लाऊज आणि लाल रंगाची नेटची ओढणी असा हा घागरा सुकन्याला अतिशय छान दिसत होताच, पण त्यापेक्षाही जास्त वडील सोबत असल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. तिचा हा व्हिडियो अतिशय इमोशनल असून सोशल मिडियावर कमालीचा व्हायरल झाला आहे.