लग्न म्हणजे मुलीसाठी आनंदाचा आणि दु:खाचा क्षण असतो. नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याने एकीकडे आनंद असतो. पण दुसरीकडे आपल्या पालकांना सोडून दुसऱ्या घरी जावे लागत असल्याने मुलींसाठी हा क्षण अतिशय भावनिक असतो. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, फुलासारखे जपले त्या आई-वडिलांना सोडून दुसऱ्या घरी जाताना मुलींना होणारे दु:ख शब्दात व्यक्त करता येणारे नसते. त्यामुळेच मुली लग्नसमारंभात अतिशय द्विधा मनस्थितीत असल्याचे दिसते. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये स्वत:च्या लग्नातच नवरी मुलगी इमोशनल झाली आणि तिला पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले (Emotional Viral Video of Bride Dancing on Stage For Her Parents).
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नवरी मुलगी स्टेजवर ‘तुझमे रब दिखता है....’ या गाण्यावर डान्स करताना दिसते. आपल्या पालकांना उद्देशून ती हा डान्स करत आहे. डान्स करताना या नवरीलाही आपल्या भावना अनावर होतात आणि ती स्टेजवरच रडत रडत या डान्सच्या स्टेप्स करताना दिसते. हॉलमध्ये लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असणारे पाहुणे तिच्या आजुबाजूला बसलेले दिसतात. नवरीच्या डोळ्यातील पाणी पाहून त्यांनाही भावना अनावर होतात आणि नकळत त्यांचेही डोळे पाणावतात. भरजरी लेहंगा घालून डान्स करताना या नवरीच्या डान्सचा व्हिडिओ आणि हा भावनिक क्षण कॅमेरात कैद होतो आणि काही वेळातच सोशल मीडीयावर व्हायरलही होतो.
ऑर्कीड ब्यूटी केअरच्या d_d_makeover या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. या नवरीच्या पालकांसाठी केलेल्या इमोशनल डान्सने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. १५ दिवसांत हा व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला असून जवळपास ३ लाख ७४ हजार जणांनी तो लाईक केला आहे. तसेच यावर नेटीझन्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत हा व्हिडिओ भावनिक असल्याचे म्हटले आहे. खरंच पालक आपल्यासाठी किती करतात अशाप्रकारच्या भावनाही अनेकांनी यावर व्यक्त केल्या आहेत.