Join us  

लंच ब्रेकमध्ये कंपनी कर्मचाऱ्यांना देते एक खास सुविधा, व्हिडिओ पाहा आणि सांगा काय वाटलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2022 12:18 PM

Employees Sleep at Office During Lunch Break Post Shared on LinkedIn Viral Video : व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल अशा कंपनीत आपल्यालाही नोकरी मिळायला हवी...

ठळक मुद्देजेवणानंतर डुलकी आल्यावर ऑफीसने काही खास झोपायची सुविधा दिली तर...आपल्यालाही अशी लंच ब्रेकनंतर आराम करायला देणाऱ्या कंपनीत नोकरी मिळायला हवी...

प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना काही ना काही खास सुविधा पुरवत असते. यामध्ये अगदी कर्मचाऱ्यांना घरुन कंपनीपर्यंत आणण्या-नेण्यासाठी बसची सुविधा असो किंवा ब्रेकफास्ट आणि दुपारच्या जेवणाची सुविधा असो. बऱ्याच कंपन्या तर आपल्या कर्मचाऱ्यांना इन्शुरन्स, पगाराशिवाय त्यांना वर्षातून १ ते २ वेळा बोनस, काही ना काही गिफ्ट अशा गोष्टी देत असतात. एखाद्या कंपनीत रुजू होताना नियमित पगाराबरोबरच कंपनी आपली कशाप्रकारे आणि किती काळजी घेते हेही कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे असते. आता दुपारचे जेवण देणे किंवा कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी फ्रेश वाटेल असे वातावरण तयार करणे हे सगळे ठिक आहे. पण एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना अशी काही अनोखी सुविधा देते की ती पाहून आपल्यालाही या कंपनीत नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही (Employees Sleep at Office During Lunch Break Post Shared on LinkedIn Viral Video). 

(Image : Google)

ऑफीसमध्ये सकाळी आल्यापासून आपण काम करत असतो. मग दुपारी कधीतरी आपल्याला भूक लागल्याची जाणीव होते. अशावेळी पोटभर जेवल्यानंतर आपल्याला काम करणे जड जाते. कारण आपल्याला आळस येतो आणि काही वेळा तर आपल्या डोळ्याच्या पापण्या नकळत मिटायला लागतात. मग झोप घालवण्यासाठी आपण कधीतरी एखादी चक्कर मारुन येतो किंवा काहीच नाही तर चहा किंवा कॉफी घेतो. त्यानेही झोप जात नसेल तर आपण चक्क डेस्कवर डोकं ठेवून काही वेळ आराम करतो. पण सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.. यामध्ये कर्मचारी लंच झाल्यानंतर आपल्या डेस्कच्या इथेच अॅडजस्टेबल खुर्चीचा बेड करुन काही वेळ एक डुलकी घेताना दिसत आहेत. 

LinkedIn वर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देताना आशिया खंडातील अनेक देशांतील कंपन्यांमध्ये अशाप्रकारे दुपारची डुलकी घेणे सामान्य आहे. डॉक्टरही अशाप्रकारे एक डुलकी घेण्याचा सल्ला देतात, असे कल्चर इतर देशांतही यायला हवे असे तुम्हाला वाटते का असे हा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे त्याबाबत काही समजू शकले नसले तरी सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटीझन्सनी अशाप्रकारची सुविधा प्रत्येक कंपनीने द्यायला हवी असेही म्हटले आहे. एक महिला सुरुवातीला मोबाइल पाहत असते, नंतर ती आपली खुर्ची अॅडजस्ट करुन पांघरुण अंगावर घेऊन झोपताना दिसते. तिच्या बाजूलाही इतर कर्मचारी अशाप्रकारे झोपलेले असल्याचे दिसते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा इतका विचार करणारी आणि अशी खास सुविधा देणारी कंपनी भारतात कधी येणार आणि आपल्याला त्यात नोकरी मिळायला हवी असेच प्रत्येकाला हा व्हिडिओ पाहून वाटू शकते.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानोकरी