सुरूवातीला फारसा परिचय नसल्यानं वरकरणी सर्व गुडीगुडी दिसल्यानंतर लग्नासाठी होकार दिला जातो. पण लग्न ठरल्यानंतरही काही गोष्टी लपवल्याचंं किंवा खोटं चित्र उभं केल्याचं समजताच लग्न मोडल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. अशीच एक खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) इटावामधून समोर आली आहे. नवऱ्या मुलाचे गावात घर नसल्याचं कळल्यानंतर नवरीसह तिच्या कुटुंबियांनी भर मंडपातून काढता पाय घेतला. मुलीच्या हट्टापुढे कोणाचंही चाललं नाही. (Bride refuses to get married)
चकरनगरमधील बिठौली परिसरात बंसरी गावातील रहिवासी विपिन कुमारचं लग्न जालौन जनपदच्या डॉलीसह ठरलं होतं. हे लग्न २२ जानेवारीला शनिवारी संध्याकाळी चकरनगरमधील एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये संपन्न होणार होतं. लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी बंसरी गावातील वरात थाटामाटात चकरनगरच्या खासगी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचली. बँण्ड बाजासोबत घोड्यावर चढण्याचा कार्यक्रमही झाला त्यानंतर वरमाला घालण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
नंतर वैवाहिक कार्यक्रमाअंतर्गत सप्तपदीचा विधी सुरू होणार होता. पंडितांनी नवरा नवरीला मंडपाच्या खाली बोलावलं आणि विधींना सुरुवात केली. त्यावेळी अचानक नवरी मुलीला कळलं की बीहडमधील गावी जाऊन तिला पतीसह राहावं लागेल. त्याचवेळी तिनं सप्तपदी घेण्यास नकार दिला.
वर पक्षानं वधू पक्षाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काही एक ऐकलं नाही. प्रकरण इतकं वाढलं की नंतर पोलिसांनाही बोलावण्यात आलं. पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी आपला विचार बदलला नाही. कुटुंबातील ज्येष्ठांनी ह्स्तक्षेप केल्यानंतर आपसात बोलणी झाली आणि नवरा, नवरी आपापल्या घरी गेले. चकरनगरच्या पोलिस विभागातील सुनील कुमार यांनी सांगितलं की, कायदेशीर प्रक्रियेसाठी कोत्याही पक्षाकडून तक्रार आलेली नाही. दोन्ही कुटुंबातील लोकांनी आपसात विषय सोडवून लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.