Join us  

अशी बायको खमकी! नवर्‍याने धुवायला टाकलेल्या कपड्यांच्या खिशात तिला सापडत रोज पैसे, आणि मग..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 7:18 PM

थेंबे थेंबे तळे साचे या या म्हणीप्रमाणे त्या मलेशियन बाईनं नवर्‍याच्या खिशात सापडणारे पैसे ( नोटा, सुट्टे पैसे) एका बरणीत साठवायला सुरुवात केली आणि वर्षभरानंतर आपण साठवलेले पैसे मोजून तिलाच आश्चर्य वाटलं.

ठळक मुद्दे‘आपण खूप नशिबवान आहे’ म्हणत एक मलेशियन व्यक्तीनं आपल्या बायकोची करामत मोठ्या कौतुकानं आपल्या ट्विटर अकाउण्टवरुन मलय भाषेतूनच जगास सांगितली.व्हॅनच्या बायकोनं सहज म्हणून केलेल्या कृतीतून एक मोठी बचत उभी राहिली.सहजतेत नियमितता असेल तर अशक्य गोष्ट शक्य होते, ते कसं हेच व्हॅनच्या बायकोची गोष्ट वाचल्यावर कळतं.

पूर्वी नवरा बायकोला घरखर्चाला जे पैसे द्यायचा, त्यातून बायको काटकसर करुन पैसे वाचवायची. आपण असे पैसे साठवतो आहोत याची खबरही नवर्‍याला नसायची. मग वर्षा दोन वर्षांनी बायको घरखर्चात काटकसर करुन केलेल्या बचतीतून घरासाठी एखादी आवश्यक वस्तू घ्यायची. मग नवरा बायकोला विचारायचा, ‘अगं हे आणण्यासाठी तुझ्याकडे पैसे कुठून आलेत?’ मग बायको माहेरचं वगैरे नाव सांगून वेळ मारुन न्यायची आणि आपली अशी काटकसर सुरुच ठेवायची.

आता ही जुनी गोष्ट कशाला? असा प्रश्न पडला असेल तर ही आपल्याला माहीत असलेली जुनी गोष्ट आताच्या काळात घडली आहे तीही मलेशियात. मलय भाषेत एक म्हण आहे, ‘ सेडकिट-सेडकिट लामा-लामा जाडि बुकिट , म्हणजे कण कण जमवला तर एक दिवस त्याचा डोंगर होतो. या म्हणीप्रमाणे त्या मलेशियन बाईनं नवर्‍याच्या खिशात सापडणारे पैसे ( नोटा, सुट्टे पैसे) एका बरणीत साठवायला सुरुवात केली आणि वर्षभरानंतर आपण साठवलेले पैसे मोजून तिलाच आश्चर्य वाटलं.

ही गोष्ट जगाला कळाली कारण ती सोशल मीडियावरुन व्हायरल झाली. कोणी केली व्हायरल तर त्या मलेशियन बाईच्या नवर्‍यानं. आपल्या ट्विटर अकाउण्टवरुन व्हॅन झुलनैदी नावाच्या व्यक्तीने ‘आपण खूप नशिबवान आहे’ म्हणत आपल्या बायकोची करामत मोठ्या कौतुकानं मलय भाषेतूनच जगास सांगितली.

व्हॅनची बायको व्हॅनचे कपडे धुवायला घेताना त्याचे शर्ट आणि पॅण्टचे खिसे तपासायची. तर तिला पैसे हमखास सापडायचेच. मग मागच्या वर्षीपासून तिने ते पैसे शिस्तीत साचवायला सुरुवात केली. वॉशिंग मशिन जवळच तिने एक बरणी ठेवली आणि त्या बरणीच्या झाकणाला फट पाडून ती त्यात नवर्‍याच्या खिशात सापडणारे पैसे टाकू लागली. परत नवर्‍याला तिनं सांगून ठेवलं की टोलचे पैसे देताना, दुकानातून खरेदी करताना तुझ्याकडे उरलेली चिल्लर तू या वॉशिंग मशीनजवळ ठेवलेल्या बरणीत टाकायची. मग नवर्‍याला ही सवयच लागली. नवरा फक्त टोल , खरेदी याद्वारे त्याच्याकडे असलेले चिल्लर पैसे टाकायचा असं नाही तर गाडीत , घरातील बैठकीच्य्या खोलीत किंवा घरातल्या एका कोपर्‍यात सापडलेले चिल्लर पैसेही आवर्जून त्या वॉशिंग मशीनजवल असलेल्या बरणीत टाकू लागला.

व्हॅन सांगतो की, हे असं वर्षभर चालू होतं. आणि मग बायकोनं बरणी उघडून पैसे मोजायचं ठरवलं. बरणी उघडल्यावर केवळ चिल्लर पैसेच नाहीतर नोटा देखील सापडल्या. या नोटा म्हणजेच व्हॅनच्या खिशात नेहमी सापडणारे पैसे तर चिल्लर म्हणजे बायकोनं सांगितलं म्हणून व्हॅननं बरणीत आवर्जून टाकलेले. व्हॅन आपल्या पोस्टमधे सांगतो की चिल्लर तर सोडून द्या केवळ जमवलेल्या नोटा मोजल्या तर मलेशियन चलनात 1,424 रिंगीट अर्थात भारतीय चलनानुसार 25,588 रुपये जमले होते. चिल्लर मोजून हे पैसे भारतीय चलनात सांगायचं तर 26,957 रुपये.

Image: Google

इतके पैसे साठलेले बघून दोघा नवरा बायकोंना खूप आनंद झाली. व्हॅन म्हणतो की आम्ही त्यातील काही पैसे बचत खात्यात टाकले. काही रुपयांचं सोनं खरेदी केलं तर त्यातली 10 टक्के रक्कम मशीदीला दान केली.व्हॅनची बायको सहज पण नियमितपणे तिला नवर्‍याच्या खिशात सापडलेले पैसे टाकत गेली आणि एवढी मोठी रक्कम साठली.

पैसे बचत करायला हवेत असं आपण ठरवतो. मोठ्या कौतुकानं घरातल्या प्रत्येकाच्या नावाची पिग्गी बॅंकही करतो. नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे पिग्गी बॅंकेत पैसे टाकले जातात. आणि नंतर सर्व पिग्गी बॅंक उपेक्षितच राहातात. पण या मलेशियन महिलेनं सहजतेतही नियमितता दाखवून थोडे थोडे करुन किती पैसे साचू शकतात हे दाखवून दिलं. 

टॅग्स :सोशल व्हायरल