प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव याचे नुकतेच त्याची गर्लफ्रेंड असलेल्या अभिनेत्री पत्रलेखा हिच्याशी चंदिगड येथे लग्न झाले. हे दोघेही नुकतेच मुंबईमध्ये दाखल झाले. त्यावेळी विमानतळावर या नवविवाहित दाम्पत्याचं रुप पाहण्यासारखं होतं. या दोघांचा लूक चर्चेचा विषय ठरला. पत्रलेखाने नेसलेल्या लाल रंगाच्या साडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अतिशय कमी मेकअप केलेला असूनही ती खूपच छान दिसत होते. तर राजकुमार रावही पांढरा कुर्ता आणि लेहंगा यामध्ये खूपच देखणा दिसत होता. यावेळी आणखी एका गोष्टीने लक्ष वेधले ती म्हणजे पत्रलेखाच्या गळ्यातील मंगळसूत्र. बंगालचा प्रसिद्ध टायगर पेंडंटमध्ये असलेले हे मंगळसूत्र दिसायला अतिशय साधे असले तरी त्याची डिझाइन मोहक दिसते. ऑक्सिडाइज लूक असलेल्या या मंगळसूत्राला खालच्या बाजुने लटकन देण्यात आले आहे. तसेच यामध्ये काळे खडे आणि मोती यांचा प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेल्या या मंगळसूत्राची किंमत थोडीथोडकी नसून १ लाख ६५ हजारच्या घरात आहे. ‘बंगाल टायगर मंगळसूत्र’ सब्यसाची यांच्या हेरिटेज कलेक्शनमधील आहे. हे कलेक्शन मध्यंतरी खूप गाजले होते, त्याचे कारणही तसेच होते. सब्यसाची मुखर्जी यांनी आपल्या हेरिटेज कलेक्शन दागिन्यांची नुकतीच जाहिरात केली. यातील दागिन्यांच्या डिझाइन्स अतिशय सुंदर होत्या मात्र त्यांनी ती जाहिरात करताना मॉडेलने घातलेल्या कपड्यांवरुन सोशल मीडियावर त्यांना नेटीझन्सनी ट्रोल केले. कारण जाहिरातीत त्यांनी वधू आणि वर दोघांनाही अतिशय बोल्ड लूकमध्ये दाखवले होते. सब्यसाची यांनी या कलेक्शनला 'इंटिमेट फाइन ज्वेलरी' असे नाव देत ते लॉन्च केले होते. नेटीझन्सनी त्यांच्या पोस्टवर अनेक कमेंटस करत त्यांना खडे बोल सुनावले. इतक्या बोल्ड लूकची मंगळसूत्राच्या जाहिरातीसाठी गरजच काय असा सवाल त्यांना अनेकांनी विचारला होता. त्यानंतर त्यांनी २४ तासांच्या आत ही जाहिरात सोशल मीडियावरुन काढून टाकली.
मंगळसूत्र हा महिलांसाठी जसा सगळ्यात महत्त्वाचा दागिना आहे, तसाच वेगवेगळ्या फॅशनच्या माध्यमातून तो मिरवायलाही त्यांना आवडतो. कधी बॉलिवूड अभिनेत्री तर कधी छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्रींची फॅशनेबल मंगळसूत्रे खूप ट्रेंडमध्ये येतात आणि मग जिच्या तिच्या गळ्यात ही फॅशन चमकू लागते. मंगळसूत्राचा पॅटर्न काळानुसार बदलत गेला तरी त्याचे महत्त्व आणि त्याप्रती असणाऱ्या भावना मात्र महिलांमध्य कायम असल्याचे दिसते. सध्या सोने, चांदी, डायमंड अशा सर्व प्रकारात बाजारात मंगळसूत्राचे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. पूर्वी मंगळसूत्र म्हटले की वाट्या असायच्याच. मात्र आताच्या फॅशनमध्ये वाट्या क्वचितच दिसून येतात. तसेच कमीत कमी मणी किंवा मण्यांशिवाय असलेले मंगळसूत्र या फॅशन सध्या इन आहेत. याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारची पेंडंट असलेले मंगळसूत्र वापरायला तरुणी पसंती देत असल्याचे दिसते. साडी किंवा पंजाबी ड्रेस, कुर्ता अगदी जीन्सवरही घालता येईल असे लहान आकाराचे मंगळसूत्र तरुणींना अधिक भावते.