लहान मुलांना खेळताना कसलंच भान राहत नाही. अनेकदा ते खेळात ते असं काही करतात की ते त्यांच्या जीवावर बेतणारं ठरु शकतं. म्हणूनच पालकांना मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं म्हणतात ते काही खोटं नाही. पालकांचं लक्ष नसेल तर खेळण्याच्या नादात होणारे अपघात मुलांच्या जीवावर बेतणारे असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक वडील आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी प्राणाची बाजी लावताना दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या हा व्हिडिओ पाहून काही क्षणासाठी आपलाही जीव टांगणीला लागतो. मात्र मुलीचे वडील अतिशय तत्परतेने पुढे येत तिला सावरतात त्यामुळे ती थोडक्यात आपटायची वाचते (Father Saving Daughter on Road from Risky Accident Viral Video).
व्हिडिओच्या सुरुवातीला एका मोठ्या रस्त्यावरुन भरधाव वेगाने एक चारचाकी गाडी जात असल्याचे दिसते. त्यानंतर एक लहान मुलगी समोरच्या रस्त्यावरुन जोरदार सायकल चालवत येते. फूटपाथवर २-३ व्यक्ती असतात, त्यांच्या दिशेने ती येते. यावेळी तिचा सयकलवरील ताबा सुटल्याचे दिसते. ती इतक्या जोरात येते की ती समोरच्या खांबावर आपटणार तेवढ्यात त्यातील एक व्यक्ती खांबाच्या मधे जातो आणि तिला धरतो. मात्र असे करताना त्या व्यक्तीच्या पायाला जोरदार लागते. ही व्यक्ती तिचे वडील असल्याचे म्हटले आहे. त्यावेळी प्रसंगावधानता दाखवून वडील मधे गेले नसते तर मुलगी या खांबावर जोरदार आपटली असती.
इन्स्टाग्रामवर VirlaHog नावाच्या पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून तो नेमका कोणत्या देशातला, राज्यातला आहे हे मात्र अद्याप समजू शकले नाही. आपल्या हातातली सायकल सोडत जीवाच्या अकांताने अशाप्रकारे मुलीचा जीव वाचवण्याचे काम एक वडीलच करु शकतात. या व्हिडिओला "Dad reflexes in action" असं कॅप्शन देण्यात आलंय. हा व्हिडिओ नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात लाईक केला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.