Join us  

अफगाणिस्तानमध्ये फॅशन फोटोग्राफी करणारी फातिमा हुसैनी! तिला कसं दिसतं बुरख्यामागे दडलेलं अफगाणी सौंदर्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 11:26 AM

कसं आहे बुरख्यामागे दडलेलं अफगाणी सौंदर्य? फॅशन हा शब्दही आज जिथे वर्ज्य आहे, त्या  अफगाणिस्तानच्या समृद्ध फॅशन जगताची कहानी सांगतेय अफगाणी फोटोग्राफर फातिमा हुसैनी..

ठळक मुद्दे मी इथेच दटून राहणार आणि माझ्या कामातून अफगाणिस्तानचं हे समृद्ध रूप जगाला दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे, असा फातिमाचा निर्धार आहे.

आपलं शरीर नखशिखांत झाकून घेणाऱ्या, बुरखा हा जगण्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या, सौंदर्य, नटणं- मुरडणं याबाबतीत आज अनेक बंधनांमध्ये अडकलेल्या अफगाणी महिला सध्या जशा दिसतात, तशा त्या काही वर्षांपुर्वी मुळीच नव्हत्या. शॉर्ट स्कर्ट घालून, हवी तशी हेअरस्टाईल आणि मेकअप करून आपल्याच आनंदात मुक्तपणे वावरणाऱ्या अफगाणी महिला ही काही फार जुनी गोष्ट नाही. ६०- ७० च्या दशकात भारतीय महिलांपेक्षाही अफगाणी महिला अधिक मुक्तपणे, स्वतंत्रपणे वावरायच्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण जसं तालिबान्यांचं आक्रमण सुरू झालं तसतसं अफगाणी सौंदर्य आणि अफगाणी फॅशन जणू लुप्त होऊन गेली. 

 

अफगाणी सौंदर्य, तिथली कला, फॅशन या सगळ्या गोष्टी जगासमोर आणू पाहत आहे अफगाणी फोटोग्राफर फातिमा हुसैनी. “Beauty amid War” या नावाने तिचं अफगाणी सौंदर्य आणि अफगाणी फॅशन या विषयाचं फोटो कलेक्शन उपलब्ध आहे. २०१९ साली महिला दिनी तिने काबूलच्या चिनी एम्बसीमध्ये या फोटोंचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. महिला आणि त्यांचं भावविश्व हा फातिमाच्या फोटोग्राफीचा मुख्य गाभा आहे. आपलं हे काम अफगाणी महिलांना प्रेरणा देणारं, त्यांच्या चाकोरीतून त्यांना बाहेर काढणारं असावं, असं तिला वाटतं. 

कसं होतं अफगाण आणि कशी आहे तिथल्या आजच्या महिलांची स्थिती हे सांगणारा फातिमाचा व्हिडियो नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये ती म्हणते की फॅशन हा अफगाणी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण तिथल्या परिस्थितीमुळे तो कधी जगाने बघितलाच नाही. 

 

फातिमा म्हणते जेव्हा मला एखाद्या अफगाणी महिलेचा फोटो काढायचा असतो, तेव्हा मला त्या महिलेच्या पित्याची, नवऱ्याची, भावाची परवानगी घ्यावी लागते. त्यांनी विचारलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. कधी कधी तर त्यांनी जी आणि जशी पोझ सांगितली आहे, तशाच पोझमध्ये फोटो घ्यावा, अशी त्यांनी इच्छा असते. 

अफगाणिस्तानात महिलांच्या बाबतीत प्रचंड विरोधाभास आहे, असं देखील फातिमा म्हणते. तिथे अनेक महिला आज उच्च पदावर काम करतात. पण तरीही एखाद्या स्त्रीने एकटीने गाडी चालविणे, लाल रंगाची लिपस्टिक लावणे किंवा मग मेकअप करण्याचे काही नियम पाळणं, हे तिथे बंधनकारक आहे. आज तर तिथल्या महिला तालिबान्यांच्या भीतीने दबून गेल्या आहेत, येणारा काळ कसा आणि किती भयावह असेल, याच्या विचारानेच मुली आणि त्यांच्या पालकांचा थरकाप उडतोय.

 

आज मी जे काम करतेय, अफगाणी महिलांचं बुरख्याआड दडलेलं सौंदर्य जगासमोर आणू पाहतेय, ते तालिबान्यांना नको आहे. ते माझ्या मागावर आहेत आणि माझं काम थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तरीही मी इथेच दटून राहणार आणि माझ्या कामातून अफगाणिस्तानचं हे समृद्ध रूप जगाला दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे, असा फातिमाचा निर्धार आहे. अफगाण महिलांना फॅशनची असलेली समज हे त्यांच्या कणखरतेचं प्रतिक आहे, असं फातिमाला वाटतं.

 

टॅग्स :सोशल व्हायरलअफगाणिस्तानफोटोग्राफ