ऑफिसच्या कामाला कंटाळून अनेकदा काही लोक राजीनामा देतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे मात्र राजीनाम्याच्या पद्धतीने सर्वांच लक्ष तर वेधून घेतलंच पण विचार करायला देखील भाग पाडलं आहे. एका कर्मचाऱ्याने ऑफिसच्या त्रासाला कंटाळून थेट टॉयलेट पेपरवरच राजीनामा दिला आहे. हा राजीनामा आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कर्मचाऱ्याने यामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सिंगापूरमधील बिझनेसवुमन एंजेला योह यांनी लिंक्डइनवर हे राजीनामा पत्र शेअर केलं. ज्यामध्ये एक कर्मचाऱ्याने कंटाळून टॉयलेट पेपरवर आपला राजीनामा लिहिला आहे. "मला टॉयलेट पेपरसारखं वाटलं. गरज पडेल तेव्हा माझा वापर केला गेला आणि नंतर कोणताही विचार न करता फेकून दिलं गेलं. ही कंपनी माझ्याशी कशी वागली हे स्पष्ट व्हावं म्हणून मी माझा राजीनामा अशा प्रकारच्या पेपरवर लिहित आहे. मी राजीनामा देत आहे" असं लिहिलं आहे.
विशेष म्हणजे कर्मचाऱ्याचा अशा प्रकारचा राजीनामा कंपनीच्या संचालकांनी स्वतः लिंक्डइनवर शेअर केला आहे. कंपनीच्या संचालक एंजेला योह यांनी हा अनुभव खूप विचार करायला लावणारा आहे असं म्हटलं आहे. "तुमच्या कर्मचाऱ्यांना इतका आदर द्या आणि कौतुक करा की जेव्हा ते कंपनी सोडतात तेव्हा ते कटुतेने नव्हे तर कृतज्ञतेने निघून जातील."
"कौतुक हा केवळ लोकांना टिकवून ठेवण्याचा एक मार्ग नाही, तर तो त्यांच्या अस्तित्वाबद्दलच्या आपल्या आदराचं प्रतीक आहे" असं एंजेला योह यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टने सर्वांनाच विचार करायला भाग पाडलं आहे. तसेच काहींनी एंजेला योह यांचं कौतुक केलं आहे. कंपनीला आपली चूक समजली असंही म्हटलं आहे. टॉयलेट पेपरवरचा राजीनामा तुफान व्हायरल होत आहे.