Join us

बाळाला जन्म देताना किती वेदना होतात, याची जाणीव असावी म्हणून होणाऱ्या नवऱ्याला दिले इलेक्ट्रिक शॉक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 20:14 IST

Viral News : इलेक्ट्रिक सिमुलेशन मशीन ज्याद्वारे महिलांना प्रसुतीवेळी किती वेदना होतात याची जाणीव करून दिली जाते. एका तरूणीनं या मशीनचा असा वापर केला की, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला झटका बसला.

Viral News : बाळाला जन्म देताना महिलांना किती वेदना होतात याची कुणीही फक्त कल्पना करू शकतात. पण प्रत्यक्षात वेदना होतात हे महिलांनाच माहीत असतं. गर्भधारणा झाल्यापासून ते बाळाला जन्म देण्यापर्यंत महिलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत पुरूषांना फारशी काही जाणीव नसते. यादरम्यान महिलांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो हे समजावून सांगण्यासाठी टेक्नॉलॉजीनं अनेक आविष्कार केले आहेत. त्यातीलच एक म्हणजे इलेक्ट्रिक सिमुलेशन मशीन ज्याद्वारे महिलांना प्रसुतीवेळी किती वेदना होतात याची जाणीव करून दिली जाते. एका तरुणीनं या मशीनचा असा वापर केला की, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला झटका बसला.

चीनच्या हेनान प्रांतातून ही अजब घटना समोर आली आहे. इथे एका तरुणीचं नुकतंच लग्न ठरलं होतं. तरुणीची इच्छा होती की, तिच्या होणाऱ्या पतीला प्रसुती वेदनांची जाणीव व्हावी. यासाठी तिनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला थेट हॉस्पिटलमध्ये पाठवलं. इथे जे झालं त्यामुळे हे नातं आता कोर्टात पोहोचलं आहे.  

या तरुणीनं आपल्या होणाऱ्या नवऱ्यावर एक अजब प्रयोग केला, ज्यामुळे ती व्यक्ती हॉस्पिटलच्या बेडवर पोहोचली. तरुणीनं डिलेव्हरीवेळी महिलांना होणाऱ्या वेदनांची जाणीव तरुणाला करून देण्यासाठी इलेक्ट्रिक सिमुलेशन मशीनचा आधार घेतला. याद्वारे लेबर पेनसारखीच जाणीव होते.

तरुणी स्वत: बाजूला उभी राहून होणाऱ्या नवऱ्याला १ ते १० लेव्हलपर्यंत झटके देत राहिली. साधारण ९० मिनिटांपर्यंत वेदनाचा अनुभव घेतल्यानंतर तरुणाची हालत बिघडली आणि त्याचे डोळेही सुजले. टिश्यूज डॅमेज झाले आणि इन्फेक्शनही झालं. त्यानंतर त्याला इमरजन्सी सर्जरी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली. 

या सगळ्या प्रकाराचा परिणाम असा झाला की, तरुणाचे कुटुंबिय भडकले आणि त्यांनी थेट हे लग्नच मोडलं. इतकंच नाही तर तरुणीला त्याला भेटूही दिलं नाही. आता कुटुंबियांनी तरुणी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून मानसिक आणि आर्थिक नुकसानाची भरपाई मिळावी.

तरुणीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की, तिची आई आणि बहिणीनं हा सगळा 'टॉर्चर सेशन' पार पाडला. तरुणानं आधी याचा विरोध केला होता. पण नंतर तो तयार झाला. लेव्हल ८ वर त्याची हालत जास्त खराब झाली होती आणि जेव्हा लेव्हल १२ वर पोहोचले तेव्हा तो घामानं भिजला होता.

टॅग्स :सोशल व्हायरलजरा हटके