तापलेल्या तव्यावर पीठ टाकायचं.. वाटीने किंवा पळीने ते गोलाकार पसरवायचं... आणि मग कडक, कुरकुरीत डोसा गरमागरम खायचा... हा डोसा करण्याचा आणि खाण्याचाही नॉर्मल प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे.. पण या डोस्याला जेव्हा आग लावली जाते, तेव्हा तयार होतो फायर हंडी डोसा.. दिल्लीत तयार झालेला हा डोसाचा अचाट प्रकार सध्या सोशल मिडियावर चांगलीच आग ओकतोय.. प्रचंड व्हायरल झालेल्या या प्रकाराने नेटकरी मंडळींना वेड लावले आहे...
खाद्य पदार्थांमध्ये करण्यात येणारे वेगवेगळे प्रयोग खवय्यांना नेहमीच आकर्षित करत असतात.. हे खाद्य पदार् खाण्यापेक्षा ते बघायलाच अनेक जणांना अधिक इंटरेस्टिंग वाटतात.. सध्या सोशल मिडियावर असाचा एक भन्नाट खाद्यपदार्थ गाजतो आहे. फायर हंडी डोसा असं या पदार्थाचं नाव... oye.foodieee या इन्स्टाग्रामच्या पेजवर हा डोसा कसा तयार होतो, याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.. डोसा तयार करण्याचा हा प्रकार खरोखरंच अतरंगी आहे.. दिल्लीमधील गीता कॉलनीतील Ayyer Ji Dosa या ठिकाणी हा डोसा मिळतो, अशी माहितीही या पोस्टमध्ये आहे..
हा डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी तो शेफ तापलेल्या तव्यावर पीठ टाकून ते पसरवून एक मोठा, गोलाकार डोसा बनवतो. त्यानंतर डोसा तव्यावरच असताना त्याच्या वरच्या बाजूवर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, इतर काही भाज्या, एक दोन प्रकारच्या चटण्या, तिखट, मीठ असं सगळं टाकतो आहे. त्यानंतर चीजची मोठी वडी हातात घेऊन तो चक्क त्या वडीला आग लावतो आणि चीज टाकतो. डोस्यावर टाकलेलं हे सगळं मिश्रण तो एका कटोरीमध्ये काढतो. त्या कटोरीवर चीज किसन टाकतो आणि वरतून हिरवी चटणी टाकतो.
त्यानंतर हा तयार झालेला डोसा तो ज्या पद्धतीने तव्यावरून काढतो, ती पद्धत देखील खूपच खास आणि बघण्यासारखी आहे. यामध्ये तो डोसा गोल गोल करतो आणि त्याचा शंखूप्रमाणे आकार बनवतो. हा शंखूसारखा किंवा कोनासारखा कडक झालेला डोसा तो आधी चीज, चटणी टाकून भरून ठेवलेल्या कटोरीमध्ये बसवतो आणि मग पुन्हा फायर स्प्रे चा वापर करून डोस्याला आग लावतो.. त्यानंतर ती कटोरी आणि डोसा असं दोन्ही सर्व्ह करतो.. आधी चीज, बटर आणि मग डोसा अशा वेगवेगळ्या पदार्थांना थेट आग लावून तयार झालेला डोसा चवीला नक्कीच खमंग, खरपूस लागत असणार.