मसाला डोसा, चीज डोसा, बटर डोसा किंवा साधा आपला प्लेन डोसा.. तुम्ही नेहमीच खात असणार.. शिवाय आता डोसा खायचा म्हणजे तो पद्धतशीर एका प्लेटमध्ये घेऊन, त्यासोबत चटणी किंवा सांबार घेऊन खायचा, अशी एकंदरीत डोसा खाण्याची कल्पना आपल्या डोक्यात फिक्स असते.. पण इथे या डोसा विक्रेत्याकडची तर मजाच वेगळी.. हा माणूस डोसा चक्क मटक्यात टाकून विकतो (fire matka dosa ) आहे.. आणि ते मडकं पण आगीत चांगलं तावून सुलाखन भाजून घेतलेलं... आहे की नाही गंमत?
एखादा पदार्थ तयार करताना त्यात किती क्रियेटिव्हीटी वापरता येते, हे ही रेसिपी पाहून नक्कीच कळतं.. इंस्टाग्रामच्या thegreatindianfoodie या पेजवर ही रेसिपी शेअर (instagram share) करण्यात आली आहे. यामध्ये आगीच्या ज्वाळा आणि त्यातून तयार होणारा फायर मटका डोसा असा हा व्हिडिओ.. हा डोसा तयार करण्यासाठी या माणसाने कमालीची मेहनत घेतली असून वेगवेगळे पदार्थ टाकून हा डोसा केला आहे.. हा डोसा मुंबईमध्ये मिळतो, असंही या पोस्ट मध्ये सांगितलं आहे. त्यामुळे डोसा करण्याची रेसिपी पाहून तो खावा वाटला तर मुंबईला गेल्यावर नक्कीच त्याचा आस्वाद घ्या..
डोसा तयार करण्यासाठी या माणसाने आधी डोसा पॅनवर पीठ टाकून मध्यम आकाराचा गोलाकार डोसा करून घेतला. त्यावर त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या दोन- तीन चटण्या, बटर, तिखट, मेयोनिज असं सगळं टाकलं. त्यानंतर सिमला मिरची, कांदा, टोमॅटो अशा सगळ्या भाज्या टाकल्या आणि त्या डोसावर चांगल्या पसरविल्या. यानंतर शेजारी असणाऱ्या एका आगीमध्ये त्याने मातीचं मध्यम आकाराचं मडकं ठेवलं. त्या मडक्यात बटर टाकलं.
तंदूरी चहा करताना जसं मडकं भाजून घेतात, तशाच पद्धतीने त्याने हे मडकं चांगलं तापवून घेतलं. त्यानंतर त्या मडक्यात कसलीतरी चटणी, भाजी टाकली. तव्यावर बनविलेल्या डोसा शंखूच्या म्हणजेच कोनाच्या आकाराचा तयार केला आणि तो या मडक्यात बसविला. हे मडकं एका ताटात ठेवलं आणि चटणीसोबत खवय्यांना हा अतरंगी डोसा खायला दिला. हा डोसा करताना त्याने जे काही पदार्थ वापरले त्यावरून तर डोसा नक्कीच चमचमीत आणि स्पाईसी झाला असणार असं वाटतं.. बघा चाखून पहायला हरकत नाही.